येस बँकेची इंटरनेट बँकीग सेवा सुरू, क्रेडीट कार्ड बिल भरण्याची मुभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संकटात सापडलेल्या येस बँकेची इंटरनेट बँकींग सेवा सुरू झाली आहे. ग्राहक आता IMPS आणि NEFT च्या माध्यमातून पैसे पाठवू शकतात.

आज येस बँकेंने ट्विट करून ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून बँकेचे बरेच कामकाज बंद होते. तसेच बँकेच्या संकटामुळे फोन पे सारखे ऍपही बंद पडले होते. आता बँकेच्या सर्व इंटरनेट सेवा सुरू झाल्या आहेत. त्यात IMPS आणि NEFT सारख्या महत्त्वाच्या सुविधांचा समावेश आहे. तसेच खातेधार त्यांचे क्रेडीट कार्डचे बिल आणि गृहकर्जाचे हफ्ते इतर बँकेच्या खात्यातून भरू शकतात.

50 हजाराची मर्यादा हटण्याची शक्यता

YES BANK मध्ये खाती असणाऱ्यांना शनिवारपर्यंत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने या बँकेच्या खातेधारकांवर जास्तीत जास्त 50 हजार रुपये काढण्याचे निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध शनिवारपर्यंत हटण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने या बँकेवर प्रशांत कुमार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. ग्राहकांसाठी सगळ्या सेवा पुन्हा बहाल करण्यासाठी बँक सातत्याने प्रयत्न करत असल्याचं कुमार यांनी सोमवारी सांगितले. ग्राहकांचा सगळा पैसा सुरक्षित असल्याचं आश्वासन देतानाच त्यांनी या आठवड्याच्या शेवटापर्यंत बँकेतून रक्कम काढण्यावर घातलेले निर्बंध मागे घेतले जाऊ शकतात असं सांगितलं. लवकरच ग्राहक पूर्वीप्रमाणे या बँकेच्या सगळ्या सुविधांचा फायदा उचलू शकतील असंही त्यांनी सांगितलं.