
सामना ऑनलाईन । लखनौ
जानेवारी ते मार्च 2019 दरम्यान होणाऱ्या लग्नांवर प्रतिबंध घालण्याचा निर्णय उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. अर्थात ही अट संपूर्ण राज्यासाठी नसून ती प्रयागराज येथे होणाऱ्या विवाहांसाठी आहे.
जनसत्ताने दिलेल्या वृतानुसार, जानेवारी ते मार्च 2019 दरम्यान प्रयागराज येथे कुंभमेळा भरणार आहे. त्यामुळे या दरम्यान प्रयागराज येथे होणारे सर्व विवाह सोहळे रद्द करण्याचे आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. या आदेशांनुसार, प्रयागराज येथे कुंभ स्नानाच्या एक दिवस आधी होणाऱ्या विवाहसोहळ्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले असून त्याच्या प्रती या प्रदेशातील हॉल, हॉटेल यांना देण्यात आल्या आहेत.
कुंभ सोहळ्याचं पहिलं स्नान मकर संक्रातीला आणि दुसरं पौष पौर्णिमेला होणार आहे. तर उर्वरित कुंभस्नानं ही मौनी अमावस्या, बसंत पंचमी, माघी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीला होणार आहेत. इतक्या कमी अवधीत विवाहासाठी दुसरी जागा शोधण्याचं आव्हान संबंधित कुटुंबांसमोर उभं ठाकलं आहे. त्यामुळे योगी सरकारच्या या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे.

























































