
सामना प्रतिनिधी, मुंबई
गोंवडी येथे राहणाऱ्या तरुणाला मैत्रिणीचा वाढदिवस भलताच महागात पडला आहे. तलवारीने केक कापणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची न्यायालयाने जामिनावर सुटका केली.
सिनेमामध्ये वाढदिवसाचा केक सुरीऐवजी तलवारीने कापताना दाखवले जाते. याचे अनेक जण अनुकरण करतात. सोशल मीडियावर चमकूगिरी करण्यासाठी व्हिडीओ अपलोड करतात. अशीच चमकूगिरी गोवंडीतील तरुणाला महागात पडली आहे. रविवारी रात्री मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तो बँड स्टॅण्डजवळ आला. तो केक सुरीऐवजी तलवारीने कापत होता. याची माहिती मिळताच वांद्रे पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी त्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्या तलवारीबाबत कसून चौकशी केली. पोलिसांनी ती तलवार ताब्यात घेत तरुणाला पोलीस ठाण्यात आणले. त्याच्या विरोधात विशेष स्थानिक गुन्हा दाखल केला. त्याला आज न्यायालयात हजर केले.




























































