
सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा
मारामारीत जखमी झालेल्या बोरखार गावातील तरूणाचा उपचारा दरम्यान शुक्रवार, दि. 22 रोजी मृत्यू झाला. अर्जुन प्रभाकर पाटील (38) असे या तरूणाचे नाव आहे. मागील शुक्रवारी त्याच्या मित्राशी त्याचे भांडण झाले होते. तेव्हा मित्राने त्याला जबर मारहाण केली होती. या मारहाणीत त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती.
त्याला नेरूळ येथील डि.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले होते. तेथेच उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात त्याचा मित्र अक्षय मनोज ठाकूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत अर्जुन पाटील यांनी अक्षयकडून उधार पैसे घेतले होते. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. या बाबत लगेच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र अक्षय तेव्हा पासून फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरिक्षक एस.जी. काठे हे अधिक तपास करत आहेत.




























































