तरुणाई चित्रपट पाहते का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तरुणाईवर हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांचा तगडा प्रभाव असल्याचं म्हटलं जात असलं तरी प्रत्यक्षात मात्र तरुणाई आज मराठी चित्रपट पाहतेय. दर्जेदार विषय आणि उत्कृष्ट मांडणी असेल तर आजचे तरुण मराठी चित्रपटाला गर्दी करतात. मात्र चित्रपटाची प्रसिद्धी करण्यात अपयश येत असल्याने प्राइम टाइमच मिळत नाही. जाणून घेऊया तरुण पिढीला आजच्या मराठी चित्रपटांविषयी काय वाटतं ते…

 प्रमोशनला वेळ द्यायला हवा

हिंदी चित्रपटांसारखी प्रसिद्धी मराठी सिनेमांना मिळत नाही हे खरं. पण त्याला जबाबदार सिनेमाची प्रसिद्धी होत नाही हे नक्कीच नाही. हिंदीतील कलाकार कितीही बडा असला तरी तो आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ठरावीक वेळ देत असतो. मराठीतील कलावंत मात्र सिनेमा पूर्ण झाला की आपलं त्याच्याशी देणंघेणं नाही असे वागतात. मराठी अभिनेत्यांची ही प्रवृत्ती बदलली पाहिजे. मराठी चित्रपट  लोकांपर्यंत नीट पोहोचला पाहिजे. त्यासाठी या कलाकारांनी प्रमोशनला वेळ द्यायला हवा.

मेघना फणसे, न्यू इंग्लीश ज्यु. कॉलेज

तगडी प्रसिद्धी व्हायला हवी

मराठी चित्रपट विषयाच्या दृष्टीने सकस होत आहेत. तरुणवर्गही चित्रपटांकडे आकर्षित होतेय. आवडते चित्रपट पाहायला तरुणवर्ग नेहमीच गर्दी करतो. निर्माता,  कलाकारांनी प्राइम टाइम मिळवण्यात प्रयत्नशील असले पाहिजे. चित्रपटाची तगडी प्रसिद्धी केली आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत चित्रपट पोहोचला तर प्राइम टाइम मिळण्यात मराठी चित्रपटांना काही अडथळा येणार नाही.

देवेंद्र जाधव, मुंबई विद्यापीठ

मराठीपण मागे पडतंय

काही मराठी सिनेमे बघायला तरुण कर्ग नक्कीच जातो. ‘दुनियादारी’ असो किंवा ‘सैराट’… हे दोन्ही चित्रपट तरुणाईने डोक्यावर घेतले.  परंतु अलीकडे मराठी चित्रपट   उगीचच हिंदी सिनेमांच्या वळणाकर जाताना दिसत आहेत. तिथेच ते फसत आहेत. चांगला विषय असेल तर मराठी चित्रपटांना प्राइम टाइम मिळणारच. तरुणाईमधलं मराठीपण मागे पडत असल्याने त्यांचं मराठी सिनेमाकडे दुर्लक्ष होतंय.

संकेत वरक, मुंबई विद्यापीठ

विषय, मांडणी चांगली हवी

मराठी चित्रपटांचे आताचे विषय तरुणांच्या जवळचे असतात. विषय आणि मांडणी चांगली असेल तर उत्कृष्ट कलाकृती तयार होते. हल्लीच प्रदर्शित झालेल्यांपैकी ‘नाळ’, ‘…आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’,यांसारख्या चित्रपटांमुळे तरुणांचा मराठी चित्रपट बघायला जाण्याचा कल वाढला आहे. पण मराठी चित्रपटांना प्राइम टाइम मिळत नाही हे खेदजनक आहे. याला कारण मराठी चित्रपटांची हवी तितकी प्रसिद्धी होत नाही. मराठी चित्रपटांनी प्रसिद्धीवर भर दिला तर चित्रपटाला प्राइम टाइमसुद्धा सहज मिळेल. जो बदल तरुणाईच्या मनाला भिडतो, त्या बदलाला तरुणाई नक्कीच पाठिंबा देते.       n अंकिता राणे, आय.डी.आय. महाविद्यालय