युवासेनेच्या दणक्यानंतर विद्यापीठ ताळ्यावर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सिनेट सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे वेळच्या वेळी देणार असून निकाल आणि मागण्यांबाबतही ठरावीक काळाने बैठका घेऊन माहिती देईल. शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार सिनेट सदस्यांनी शुक्रवारी कुलगुरू प्रो. सुहास पेडणेकर यांना त्यांच्या दालनातच घेराव घातल्यानंतर त्यांनी हे लेखी आश्वासन दिले.

मुंबई विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यावर सिनेट सदस्यांनी वारंवार आवाज उठवूनही आश्वासनांशिवाय ठोस कार्यवाही केली जात नाही. या पार्श्वभूमीवर युवासेना सिनेट सदस्यांनी कुलगुरूंच्या दालनातच ठाण मांडून जोपर्यंत कुलगुरू लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत बसून राहण्याचा निर्णय घेतला. इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरूंच्या दालनात थेट जाऊन असे आंदोलन करण्यात आले. यावेळी कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी सिनेट सदस्यांच्या सर्व प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देत लेखी आश्वासनच दिले. यावेळी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे, प्रवीण पाटकर, शीतल शेठ-देवरुखकर, निखिल जाधव, सुप्रिया करंडे, मिलिंद साटम, वैभव थोरात, कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे उपस्थित होते.

अशी दिली ठोस आश्वासने

  • पहिल्या शनिवारी नोंदणीकृत पदवीधर सिनेट सदस्यांची बैठक घेणार.
  • 14 डिसेंबरला कुलगुरू आढावा बैठक घेऊन पुढील मागण्यांचा आराखडा देणार.
  • कलिना, ठाणे, कल्याण, रत्नागिरी उपकेंद्रांतील रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी सिनेट सदस्याची नेमणूक होणार.
  • कलिना कॅम्पसमध्ये वाय-फाय, सीसीटीव्ही बसविण्याचा आराखडा 14 डिसेंबरला देणार.
  • मादाम कामा हॉस्टेल फीबाबत निर्णय घेण्यासाठी महिला सिनेटची नेमणूक.
  • मोबाईल ऍपबाबत कुलगुरू स्वतः लक्ष देणार, सिनेट स्वतः पाहणी करणार.