ऐतिहासिक सुधागड-पाली

>> संदीप विचारे
 
पाली भोर संस्थानच्या अखत्यारीत येणाऱया सुधागडावर भोराईचे ठाणे आहे. याचा दरवाजा रायगडाच्या महाद्वाराची याद देतो. पूर्वेकडे तेलबैलाच्या प्रस्तर भिंती दिसतात. पालीत राहण्या-जेवणाची सोय आहे. या दिवाळीच्या सुट्टीत ‘‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’’ याची प्रचीती घ्यायची असेल तर ऐतिहासिक पाली-सुधागडला भेट द्यायलाच हवी.
झपाटय़ाने विकसित होणारे सुधागड-पाली म्हणजे पालीच्या बल्लाळेश्वराचे गाव. इमॅजिका, कुंडलिका रिव्हर राफ्टिंग, छोटे-मोठे रिसोर्ट, जांभुळपाडा आणि बल्लाळेश्वर गणपती मंदिर अशा अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेल्या सुधागड-पालीला इतिहासाची सुवर्ण किनार आहे.
1657 च्या ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या वसुबारसेच्या मुहूर्तावर श्रीशिवराय राजगडाहून सुधागडजवळील तेलबैलाच्या घाटाने कोकणात उतरले आणि कल्याण-भिवंडीपासून सारसगड, सागरगड, सुधागड हे किल्ले हस्तगत केले. पाली-खोपोली रस्त्यावर कोकणातून घाटावर पायी जाण्याकरिता तेलबैला, सवाष्णी घाट हे मार्ग अजूनही वापरात आहेत. या घाटमार्गावरील ठाणाळे लेणी पाली-सुधागडचा इतिहास बौद्धकाळापर्यंत मागे नेतात.
स्वराज्यावर चालून आलेला उझबेकी मुघल सरदार कारतलब खान पुण्याहून तुंगारण्यामार्गे कोकणात उतरत असताना श्री शिवरायांनी त्याला तुंगारण्यातील उंबरखिंडीत कोंडले. कारतलब खान शिवरायांना शरण गेला. दिल्लीच्या बलाढय़ मुघलिया सल्तनतचा मातब्बर सरदार कारतलब खान सह्याद्रीने शिवरायांसमोर गुडघे टेकताना बघितला. 2 फेब्रुवारी 1661, पाली-खोपोली रस्त्यावर शेमडी गावातून उंबरखिंडीकडे जाण्याचा रस्ता आहे. इथे अंबा नदीच्या पात्रात उंबरखिंड युद्धाचे स्मारक आहे. पूर्वेकडील जंगलात उंबरखिंड आहे.
शिवकाळाप्रमाणे शंभूराजांच्या काळातही पाली-सुधागड परिसराने इतिहासामध्ये आपला ठसा उमटवला आहे. औरंगजेबापासून फारकत घेऊन निघालेला शहजादा अकबर राजपूतांनी आश्रय दिला नाही म्हणून दुर्गादास राठोडसह नर्मदा ओलांडून महाराष्ट्रात आला. त्याला खात्री होती आपण बापाविरुद्ध उभारलेल्या बंडाला मराठय़ांकडूनच मदत मिळेल. शंभूराजांनीही अकबराचे स्वागत केले. शंभूराजे आणि अकबर यांची भेट 13 नोव्हेंबर 1681 ला सुधागडच्या पायथ्याशी असलेल्या पाच्छातूर गावात झाली. अकबराने राजपूत आणि मराठय़ांच्या मदतीने दिल्लीचे तख्त काबीज करायचे, खाशा औरंगजेबाला कैद करायचे, असा थोरला मनसुभा पाच्छापूरमध्ये ठरला. पण नियतीचे फासे उलटे पडले आणि अकबर इराणला पळून गेला आणि औरंगजेब मराठी मुलुख आणि शंभूराजांना काबीज करण्याकरिता दख्खनेत उतरला. पालीजवळ पाच्छापूर गावात ही ऐतिहासिक भेट झाली आणि सह्याद्री थरारला! श्री शिवछत्रपतींच्या निधनानंतर छत्रपती झालेल्या शंभूराजांना अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, सोमाजी दत्तो, हिरोजी फिर्जंद यांनी कटकारस्थान करून त्रास दिला. ऑगस्ट 1681 च्या आसपास बाळाजी आवजी चिटणीस, सोमाजी दत्तो, हिरोजी फर्जंद यांना शंभूराजांनी परळीजवळ कैद करून हत्तीच्या पायी दिले. पाली-खोपोली रस्त्यावर पेडलीजवळ औंढय़ाच्या माळावर बाळाजी आवजी चिटणीस यांची समाधी आपण आजही पाहू शकतो.
पालीमुक्कामी पाली-खोपोली रस्त्यावर शेमडी गावाजवळील उंबरखिंड, जांभुळपाडय़ातील गणपती, पुढे भेलीवजवळील मृगगड, कोंडगावचे धरण, पालीजवळी सारसगड, नाडसूरजवळील सुधागड, नागशेतजवळील खडसंबाळे लेणी आणि नदीपात्रात तयार झालेली राजणकुंडजवळील कोंडजाईदेवी आणि रामवरदायनी देवीचे ठाण, एकवीस गणपती मंदिर, उद्धरची गरम पाण्याची कुंडे, ठाणाळे लेणी, पाच्छापूर आणि अष्टविनायकापैकी एक बल्लाळेश्वर गणपती मंदिर अशा अनेक ठिकाणांना आपण भेटी देऊ शकतो. पालीहून वाकण मार्गे अलिबाग. ताम्हणी घाटातून पुणे, घरोशी मार्गे रायगडजवळ करता येतो. प्रवासात अंबा नदीचा प्रवास आपल्याल्या साथ करत असतो. पाली भोर संस्थानच्या अखत्यारीत येणाऱया सुधागडावर भोराईचे ठाणे आहे. याचा दरवाजा रायगडाच्या महाद्वाराची याद देतो. पूर्वेकडे तेलबैलाच्या प्रस्तर भिंती दिसतात. पालीत राहण्या-जेवणाची सोय आहे. या दिवाळीच्या सुट्टीत ‘‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’’ याची प्रचीती घ्यायची असेल तर ऐतिहासिक पाली-सुधागडला भेट द्यायलाच हवी.!
आपली प्रतिक्रिया द्या