IND vs ENG – रोहित-गिलनं खणखणीत शतक ठोकलं, यशस्वीला डोळे वटारणाऱ्या गोलंदाजाला चोप चोप चोपलं

धर्मशाळेमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि शुभमन गिलने खणखणीत शतक ठोकले आहे. या दोघांच्या शतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने लंचपर्यंत 1 बाद 264 धावा केल्या आणि 46 धावांची आघाडी मिळवली. रोहित शर्मा 102, तर शुभमन गिल 101 धावांवर नाबाद आहे.

धर्मशाळा कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपताना रोहित शर्मा 52, तर शुभमन गिल 26 धावांवर नाबाद होता. दुसऱ्या दिवशी दोघांनीही इंग्लंडच्या टीमला ‘बॅझबॉल’चे धडे दिले. दोघांनीही चौकार-षटकारांची आतषबाजी करत शतकाला गवसणी घातली. रोहितने या मालिकेतील दुसरे शतक ठोकत 400 धावांचा टप्पाही पार केला.

दुसरीकडे शुभमन गिल यानेही आक्रमक अंदाजात खेळत कसोटी क्रिकेटमधील चौथे शतक ठोकले. गिल आणि रोहित या जोडीमध्ये दीडशे धावांची भागिदारी झाली आहे. ही जोडी आणखी काळ खेळपट्टीवर पाय रोवून उभी राहिली तर टीम इंडियाची धावसंख्या आजच 400 पार पोहोचेल आणि मजबूत आघाडीकडे वाटचाल सुरू होईल.

बशीरला चोपले

दरम्यान, पहिल्या दिवशी यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बशीर याने डोळे वटारत जल्लोष केला होता. मात्र दुसऱ्या दिवशी रोहित आणि शुभमनने बशीरचा चांगलाच समाचार घेतला. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंतने बशीरच्या 23 षटकात 4.80 च्या सरासरीने 111 धावांची लयलूट करण्यात आली होती.

विक्रमांचा यशस्वी पाठलाग

मालिकेच्या चौथ्या कसोटी सामन्यात यशस्वी जैसवालने विराट कोहलीच्या 655 धावांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. गुरुवारी पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी हिंदुस्थानने आपला पहिला डाव सुरू केला. यशस्वीने एक धाव घेताच तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत हिंदुस्थानकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. एवढेच नव्हे तर कसोटी मालिकेत 700 पेक्षा अधिक धावा करणारा दुसरा हिंदुस्थानी फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत सुनील गावसकर यांनी वेस्ट इंडीजविरुद्ध 774 (1971) आणि 732 (1978-79) धावा केल्या होत्या. आता यशस्वीचेही त्यात नाव जोडले गेले आहे. तसेच यशस्वीने आपल्या 16 व्या डावात एक हजार कसोटी धावांचा पल्ला गाठला. विनोद कांबळीने 14 डावांत ही मजल मारली होती, जी यशस्वीला गाठता आली नाही.