गेल्या दोन वर्षांत विकासदरात महाराष्ट्राचे स्थान घसरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रगतशील महाराष्ट्राची गेल्या काही वर्षांत विकास दराच्या बाबतीत मोठी घसरण झाल्याचा निष्कर्ष ‘पहले इंडिया फाऊंडेशन’ या ‘एनजीओ’ने आपल्या सर्वेक्षणात काढला आहे. महाराष्ट्राला साखर, पर्यटन आणि अल्कोबेव्हरेजेस (शीतपेये)उत्पादन क्षेत्रांत मोठी भरारी घेण्याची संधी आहे, मात्र त्यासाठी राज्य सरकारने अनेक प्रभावी उपाययोजना राबवायला हव्यात अशी सूचना ‘पहले इंडिया’ने आपल्या ‘ऍन इंटिग्रेटेड व्हॅल्यू चेन ऍप्रोच टू ईस ऑफ डुइंग बिझनेस  अ केस स्टडी ऑफ शुगर, अल्कोबेव्ह ऍण्ड टुरिझम’ या सर्वेक्षण अहवालात केल्या आहेत.

2014-15 या आर्थिक  वर्षात महाराष्ट्राच्या विकास दरात देशात आठवा  क्रमांक होता. पण 2017-18 या आर्थिक वर्षात राज्याची 13 व्या स्थानावर घसरण झाली.

ही घसरण रोखून पुन्हा उन्नतीच्या दिशेने झेप घेण्यासाठी महाराष्ट्राला साखर उद्योग आणि पर्यटन उद्योगाचा मोठा उपयोग होऊ शकतो असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

साखर उद्योग लाभदायक

महाराष्ट्रात 2017-18 मध्ये  72,73,7,000 टन साखरेचे तर 3,63,000 टन मळीचे उत्पादन झाले आहे. ही मळी अल्कोहोल आधारित शीतपेये तयार करण्यासाठी वापरली जाते. म्हणजेच राज्याला साखर क्षेत्रातील उैस उत्पादनातूनही मोठी आर्थिक कमाई होऊ शकते, असे पहले इंडियाच्या सहलेखिका व संशोधनप्रमुख निरूपमा सौदरराजन यांनी म्हटले आहे.

पर्यटन क्षेत्रही विकासाला हात देऊ शकते

महाराष्ट्र पर्यटन क्षेत्राने वर्षभरात 11 टक्के पर्यटनवाढ करीत नवे रोजगार आणि उत्पन्न राज्याला मिळवून दिले आहे, मात्र त्यात अधिक प्रगती साधण्यासाठी राज्य सरकारने हॉटेल्स उभारणी मंजुरीसाठी एकखिडकी योजना राबवायला हवी असे आग्रही मत नॅशनल रेस्टॉरन्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अनुराग कटियार यांनी व्यक्त केले.