
सामना प्रतिनिधी । मुंबई
येत्या सहा महिन्यांत प्राध्यापकांची रिक्त पदे भरा अन्यथा अनुदान बंद केले जाईल, असा इशारा विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांना दिला आहे.
48 केंद्रीय विद्यापीठांमध्ये सुमारे पाच हजार पदे रिक्त आहेत. यूजीसीच्या अखत्यारीत 900 विद्यापीठे आणि 40 हजारांपेक्षा जास्त महाविद्यालये येतात. यूजीसीने नुकतेच एक परिपत्रक काढले. उच्च शिक्षण संस्थांनी त्यांच्याकडील रिक्त जागांची माहिती https://nherc.in या वेब पोर्टलवर 20 जूनपर्यंत अपलोड करावी. त्यानंतर संस्थेच्या संबंधित अधिकाऱयांनी रिक्त जागा भरण्यास पुढील 30 दिवसांत परवानगी द्यावी आणि त्याच्या 15 दिवसांत त्या पदांसाठी जाहिरात द्यावी. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालय आणि यूजीसी या वेब पोर्टलच्या आधारे या रिक्त जागा भरल्या जात आहेत की नाहीत यावर लक्ष ठेवेल, असे या परिपत्रकात नमूद आहे.पुढील चौथ्या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व अर्जांची छाननी करून निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतपत्रे पाठवावीत आणि ती संस्थेच्या वेबसाईटवर अपलोडही करावीत. पाचव्या महिन्यात मुलाखती घेऊन उमेदवारांची अंतिम निवड करावी आणि सहाव्या महिन्याच्या अखेरपर्यंत नियुक्तीपत्रे पाठवावीत आणि तीसुद्धा वेबसाईटवर अपलोड करावीत, अशाही सूचना दिल्या आहेत.



























































