
सामना प्रतिनिधी। सिंधुदुर्गनगरी
26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी आपल्या विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्गनगरीमध्ये 14 उपोषणे झाली. यापैकी 10जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर 4 उपोषणे जिल्हा परिषद कार्यालयाशी संबंधित होती. मात्र पालकमंत्री दिपक केसरकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांच्या समस्या सोडविल्या जातील असे आश्वासन दिल्यावर ही उपोषणे मागे घेण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 10 उपोषणे करण्यात आली. यात कणकवली तालुक्यातील जानवली रामेश्वरनगर येथील अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यास जिल्हा परिषद प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करत जिप प्रशासनाविरोधात कणकवली शिवसेना उपतालुकाप्रमुख भालचंद्र दळवी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.
कणकवली तालुक्यातील तयारी रस्त्याचे 2016-17 मध्ये नूतनीकरण करण्यात आले. मात्र या रस्त्याचे नूतनीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने आपण नगरपंचायत कडे तक्रार केली होती. यावेळी मात्र रस्त्याचे दर्जेदार काम केले जाईल अशी ग्वाही नगरपंचायत अभियंत्यांनी दिली होती. मात्र प्रत्यक्षात रस्त्याचे काम निकृष्ट झाले आणि पहिल्याच पावसात रस्त्यावरील खडी उखडून रस्ता नादुरुस्त झाला. त्यामुळे संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. तसेच संबंधित प्रशासन निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत निष्कृष्ट रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी यासाठी तसेच कणकवली नगरपंचायत हद्दीतील मराठा मंडळ समोरील स्मशानभूमीतील 21 गुंठे जागेपैकी प्रत्यक्षात 17 गुंठे जागा दिसत आहे. त्यामुळे उर्वरित चार गुंठे जागा कुठे गेली? असा प्रश्न करत गायब झालेली जमीन स्मशानभूमीसाठी मिळावी. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कणकवली शहराध्यक्ष शैलेंद्र नेरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.
कुडाळ तालुक्यातील मुळदे पन्हाळवाडी येथील शिवराम रघुनाथ पालव यांच्या घरा वरून मोठ्या केवीची वीज वाहिनी जात असून ही वीज वाहिनी आपल्या घरा सहकुटुंब यांच्या जीवितास धोका दायक आहे. त्यामुळे सदर वीजवाहिनीचा मार्ग बदलून द्यावा अशी मागणी अनेक वेळा वीज वितरण कंपनीकडे करण्यात आली आहे. मात्र त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात असल्याने सदरची धोकादायक वीज वाहिनीचा मार्ग बदलून मिळावा. या मागणीसाठी पालव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.
मळगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच व त्यांच्या शिक्षिका पत्नी या शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत आहेत. शासकीय कर्मचारी असूनही संबंधित दांपत्य शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी तसेच त्या दोघांचेही पदमुक्त करावे या मागणीसाठी सावंतवाडी तालुक्यातील मळगाव देऊळवाडी येथील धोंडू सावंत, कृष्णा गावडे, भालचंद्र सावंत, दाजी सावंत, मनोहर राऊळ, आबा नार्वेकर, दिलीप सोनुरलेकर, महेश शिरोडकर आदी ग्रामस्थांनी उपोषण केले.
वेंगुर्ले तालुक्यातील खवणे भगत वाडी येथे आपल्या मालकीच्या जमिनीत पाण्याची विहीर असून या विहिरीचे पाणी आम्ही आणि इतर शेजारी गेली अनेक वर्षापासून वापरत आहोत. मात्र आमचे भाऊबंद यांनी आपण व आपली पत्नी वयोवृद्ध असल्याचा फायदा घेत आपल्याला मारझोड करून व धमकावून आपल्या विहिरीवरील पाण्याच्या पंपाचे तोडमोड करून आपल्याला पाण्यापासून वंचित ठेवले आहे. या याबाबत आपण निवृत्ती पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत यांचे लक्ष वेधले आहे. मात्र त्यांच्याकडून काहीच होत नाही परंतु आपल्याला पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे याकडे जिल्हा प्रशासन लक्ष वेधण्यासाठी खवणे येथील दशरथ खोत यांनी उपोषण केले.
विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी काळसे धनगरवाडी येथील ग्रामस्थांचे उपोषण
मालवण तालुक्यातील काळसे धनगरवाडी येथे जाण्यासाठी साधी पाय वाट सुद्धा नाही. हा भाग डोंगराळ भागात असल्याने त्याठिकाणी शासनाची कोणतीही योजना पोचलेली नाही. येथील ग्रामस्थ शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहिले आहेत. याकडे अनेक वेळा लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले आहे. मात्र त्याकडेही दुर्लक्ष झाल्याने धनगर वाडीतील ग्रामस्थांनी पाणी रस्ता आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.
सावंतवाडी तालुक्यातील न्यू सबनीस वाडा येथील उमाबाई वारंग या वृद्ध महिलेला शेजारील कुटुंबांकडून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. याबाबत पोलीस स्टेशन येथे तक्रार देऊनही काही होत नाही. त्यामुळे आपल्या जीवितास धोका असल्याने धमकी देणार्यांवर कारवाई हवी यासाठी वयोवृद्ध महिला उमाबाई वारंग यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.
सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली ग्रामपंचायती ग्रामसेवक तांबे यांनी अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी विकास केरकर यांनी अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र प्रशासनाकडून काही होत नसल्याने 3 जुलै 2018 रोजी आत्मदहनाचे नोटीसही दिली होती. यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा करत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र जिल्हा परिषद प्रशासन संबंधित ग्रामसेवकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत ग्रामसेवकांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी विकास केळकर यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण केले.
माध्यमिक शिक्षण विभागाकडून सन 2017-18 आणि सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्यात आले आहे. मात्र हे समायोजन पूर्णतः नियमबाह्य व अर्थपूर्ण व्यवहार झाले असल्याचा आरोप सावंतवाडी साहिल वाडा येथील गोविंद वाडकर वाडकर यांनी केला आहे. अतिरिक्त शिक्षकांचे व नवीन शिक्षकांची मान्यता देताना यांची अद्यावत सेवा जेष्ठता यादी प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आलेली नाही आणि मागासवर्गीय कक्ष मुंबई यांस कडून अद्यावत रोस्टर रजिस्टर ची पाहणी करण्यात आले नाही. शासकीय नियमानुसार बाबींची पूर्तता करणे आवश्यक होते. मात्र नियमबाह्य अर्थपूर्ण बेकायदेशीरित्या शिक्षकांचे समायोजन करून माध्यमिक शिक्षण विभागाने मागासवर्गीय इतर मागासवर्गीय समाजातील कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे आणि याला संपूर्णतः माध्यमिक शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जबाबदार आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी उपोषण केले.
करली नदी पात्रातील मालवण तालुक्यातील आंबेरी वाकवाडी येथील वाळू उपशाला तेथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. ग्रामस्थांच्या मते येथील उत्खनन झाल्यास ग्रामस्थांचे शेती बागायती यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तसेच जाणाऱ्या जनावरांची ये जा करताना अनेक अडचणी येणार आहेत. तसेच तेथील जुवा बेट नष्ट होणार आहे. त्यामुळे त्यांच्या मागणीचा विचार करून शासनाने आंबेरी वाकवाडी येथील वाळू उत्खननास परवानगी देऊ नये यासाठी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.
कुडाळ तालुक्यातील पांग्रड गावातील रेडेवळवाडी येथे 2015 मध्ये नळपाणी योजनेचे काम करण्यात आले आहे. हे काम अर्धवट स्थितीत असल्याने आपण 5 जानेवारी 2018 रोजी कुडाळ पंचायत समिती येथून माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता त्यात आपल्याला हे काम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या माहिती तफावत आढळून आल्याने आपल ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे तत्कालीन सम्बंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांनी हे काम अर्धवट आहे आम्ही त्यात फसवणूक केली आहे असे सांगितले. त्याचे आपल्याकडे फोन रेकोर्डिंगही आहे. त्यामुळे आपण 9 एप्रिल 2018 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे या कामाची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र त्यांनी कोणतीही चौकशी केली नाही. त्यामुळे आपण कुडाळ तहसीलदार यांच्याकडे या कामाच्या चौकशी ची मागणी 24 मे 2018 रोजी केली. हा मागणी केली असता रेडेवळवाडी येथील अर्धवट नळपाणी योजनेचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळीचे फोटोही आपल्या कडे आहेत. मात्र एवढे पुरावे असताना आणि तक्रार अर्ज करूनही जिल्हा परिषद प्रशासन आणि कुडाळ तहसीलदार रेडेवळवाडी नळपाणी योजनेच्या कामाची चौकशी करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप प्रवीण मर्गज यांनी जिप समोर उपोषण केले.

































































