
कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि उपलब्ध आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी महापालिकेने डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन आदी 500 जागा आठवडाभरात भरणार असल्याची माहिती महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली.
सोलापूर शहरात कोरोना रुग्णांचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असून, अथक रुग्णसेवा करणाऱया यंत्रणेवर कामाचा भार अधिक आहे. रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी परिचारिका व अन्य पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 400 ते 500 कर्मचाऱयांची भरती केली जाणार असून, प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य याप्रमाणे ही भरती होणार आहे. येत्या आठवडाभरात नोकरभरती पूर्ण करून आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे पांडे म्हणाले. ही नोकरभरती कोविड कालावधीसाठी हंगामी स्वरूपाची असणार आहे.
कोरोनाविरुद्धच्या या युद्धामध्ये सरकारी यंत्रणा अथक प्रयत्न करीत असून, कोरोनाचे हे संकट परतवून लावण्यासाठी विविध समाजसेवी संस्था, संघटना आणि धर्मगुरूंचे सहकार्य अपेक्षित आहे. या घटकांकडून क्वारंटाइन सेंटर उभारून त्यांच्यासाठी भोजन व औषधोपचारांची मदत झाली तर मोठा हातभार लागेल. वैद्यकीय साहित्यासाठी समाजाकडून प्रतिसाद मिळावा, असे आवाहन महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी केले आहे.
महापालिका आरोग्य विभागाकडील 100 कर्मचाऱयांनी मोदी स्मानशभूमीत स्वच्छतेचे काम केले. दोन जेसीबी आणि दोन डंपरमधून येथील कचरा उचलण्यात आला. शहरातील सर्व स्मशानभूमींच्या स्वच्छतेसाठी महापालिका प्रयत्न करणार असून, औद्योगिक क्षेत्रांनी त्यांच्या ‘सीएसआर’ फंडातून विद्युतदाहिनी व गॅसदाहिनीसाठी प्रयत्न केल्यास अंत्यसंस्कारासाठी वापरल्या जाणाऱया लाकडांचे प्रमाण कमी होऊन पर्यावरणाची हानी टळेल, असे उपायुक्त धनराज पांडे यांनी सांगितले.






























































