
ड्रग्जप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने एजाज खानला अटक केल्यानंतर गुरुवारी रात्री जोगेश्वरी आणि नवी मुंबईत कारवाई करून मोठय़ा प्रमाणात ड्रग्ज जप्त केले. एनसीबीने जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे. तर दुसरीकडे दाऊदचा हस्तक दानिश मर्चंट ऊर्फ दानिश चिकनाला एनसीबी राजस्थान युनिटने चरससह ताब्यात घेतले. त्याला पुढील कारवाईसाठी मुंबई एनसीबीच्या ताब्यात दिले जाणार आहे.
नुकतीच एनसीबीने ड्रग्जतस्कर शादाब बटाटाला अटक केली होती. त्याच्या चौकशीत एजाजचे नाव समोर आले. त्यानंतर एनसीबीने एजाजला अटक केली. एजाजच्या चौकशीत काही जणांची नावे समोर आली. त्यानंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकातील अधिकाऱयाने नवी मुंबई आणि जोगेश्वरी येथे कारवाई करून दोघांना अटक केली. नवी मुंबई येथून अटक केलेल्या नायजेरियन इसमाकडून एनसीबीने 260 ग्रॅम हेरॉईन आणि 22 ग्रॅम कोकेन जप्त केले. तर दुसरी कारवाई एनसीबीने जोगेश्वरी परिसरात केली. एमडीची तस्करी करणाऱया नासीर समुद्दीनला एनसीबीने अटक करून त्याच्याकडून 55 ग्रॅम एमडी जप्त केले. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे दीड कोटी रुपये इतकी आहे. ड्रग्ज तस्करीप्रकरणी दोघांना एनसीबीने अटक केली.
दाऊदचा हस्तक एनसीबीच्या जाळ्यात
दाऊदचा हस्तक आणि डोंगरीत ड्रग्जची फॅक्टरी चालवणारा दानिश चिकनाला एनसीबी राजस्थान युनिट आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्त कारवाई करून पकडले. दानिश हा राजस्थानच्या कोटा येथे असल्याची माहिती दोन्ही यंत्रणांना मिळाली. त्यानंतर सापळा रचून दानिशला पकडले. त्याच्याकडून चरस जप्त केले दानिश हा चिंकू पठाण आणि दाऊद गँगशी संबंधित आहे.


























































