
सौदी अरबसह मध्य पूर्व आशियात उष्णतेची लाट पसरली असून प्रचंड उष्म्यामुळे हज यात्रेतील तब्बल एक हजार भाविकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. उष्णतेच्या लाटेचा हज यात्रेवर गंभीर परिणाम झाला आहे. आज तब्बल 550 हज यात्रेकरूंचा उष्माघाताने मृत्यू झाला. प्रचंड उष्म्यामुळे मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
तीव्र उष्णतेमुळे 68 हिंदुस्थानींना जीव गमवावा लागला. यात मोठय़ा संख्येने ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असल्याचे समजते.
हवामान बदलामुळे सौदीतील वातावरण वेगाने बदलत असून तापमान 50 अंश सेल्सियसहून अधिक आहे. त्यामुळे अक्षरशः भाजून काढणाऱया उन्हाचा अनुभव येथील लोक घेत आहेत. आज मक्का येथे तब्बल 51.8 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली. यात्रेकरूंना उन्हाचा कमीत कमी त्रास व्हावा यासाठी स्थानिक प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.
सर्वाधिक यात्रेकरू इजिप्तचे
सौदी अरेबियात मक्का येथे हज यात्रेत मृत्यू झालेले यात्रेकरू हे वेगवेगळय़ा देशातील आहेत. यामध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये 323 सर्वाधिक यात्रेकरू इजिप्तमधील होते, अशी माहिती सौदी अरेबियाच्या प्रशासनाने दिली आहे.
हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्रालय काय म्हणाले
याप्रकरणी जेद्दाहमधील हिंदुस्थानी दूतावासाला पत्र पाठवण्यात आल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली. केरळमधील सुमारे 18 हजार 200 भाविक सौदी अरेबियाला गेले आहेत.

























































