
सामना ऑनलाईन । बंगळुरू
कर्नाटकातील दावणगेरेमध्ये तीक्ष्ण प्रत्यंगिरा देवी मंदिरात शनिवारी शनिअमावस्येनिमित्त अनोखे हवन करण्यात आले. या हवनात नेहमीचे आहुती साहित्य वापरण्याऐवजी चक्क लाल मिरच्यांची आहुती देण्यात आली होती. देवीची कृपा मिळवण्यासाठी, समाजाचा विकास आणि कल्याण होण्यासाठी 1008 किलो लाल मिरच्या, भाज्या, नारळ आणि मिठाई वापरण्यात आल्याचे पुजाऱ्यांनी सांगितले. ऑनलाईन ट्रेडिंग कंपनी तीन माँक सोल्युशन इंटरनॅशनल,स्थानिक राजकारणी, रियल इस्टेट तज्ज्ञ, नेते आणि व्यावसायिकांनी या हवनाचे आयोजन केले होते. या हवनासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
पुजारी अघोर किशोर गणपती राट यांच्या देखरेखीखाली हे हवन करण्यात आले. व्यावसायिक, उदोयगपती, विविध क्षेत्रातील आर्थिक उलाढाल वाढवण्यासाठी समाजात शांतता आणि स्थैर्य कायम राहावे यासाठी हे हवन करण्यात आल्याचे राट यांनी सांगितले. या हवनामुळे भाविकांचे आयुष्यमान वाढणार असल्याचेही राट यांनी सांगितले. मिरच्यांच्या हवनामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होईल. मिरच्यांच्या धूरामुळे खोकला येणे, ठसका लागणे, श्वास घेण्यास अडचण होणे असा त्रास होण्याची शक्यता होती. त्यामुळे या हवनाला परवानगी देण्याबाबत साशंक होतो. मात्र, कोणताही त्रास होणार नाही असे गुरुजींनी सांगितल्यानंतर हवनाला परवानगी दिली असे महापालिका अध्यक्ष एच.के. हलेश यांनी सांगितले. या हवानाच्यावेळी कोणालाही काहीच त्रास झाला नाही असे त्यांनी सांगितले. हवनासाठी 1008 किलो लाल मिरच्या, 1008 नारळ, सफरचंद,मोसंबी, मिठाई आणि 1008 किलो भाज्या वापरण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
























































