
>> नवनाथ शिंदे
वाहतूक कर्मचाऱ्यांनो तुम्ही जर नियमनासाठी नियुक्ती केलेल्या चौकात थांबत नसल्यास तुमची थेट उचलबांगडी होउ शकते. असाच अनुभव काही वाहतूक कर्मचाऱ्यांना आला आहे. वाहतूक उपायुक्तांनी अचानकपणे केलेल्या पाहणीत कर्मचारी चौकात हजर नसल्याचे दिसून आल्यामुळे 11 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना वाहतूक मुख्यालयात बसविण्यात आले आहे. हे कर्मचारी खडक, विश्रामबाग, स्वारगेट, कोथरुड, डेक्कन वाहतूक विभागात कार्यरत होते.
मुख्यालयात येत होत्या तक्रारी
अनलॉकनंतर शहरातील रस्त्यावर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर वाहतूककोंडी टाळण्यासाठी प्रत्येक वाहतूक विभागातंर्गत नियमनासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. मात्र, ठरवून दिलेल्या चौकातही काही कर्मचारी हजर राहत नसल्याच्या तक्रारी वाहतूक मुख्यालयाला प्राप्त झाल्या होत्या.
उपायुक्तांनी अचानक केली पाहणी
त्यानुसार वाहतूक पोलीस उपायुक्त राहूल श्रीरामे यांनी बुधवारी अचानकपणे खडक, विश्रामबाग, स्वारगेट, कोथरुड, डेक्कन वाहतूक विभागात पाहणी केली. त्यावेळी नियुक्त केलेल्या चौकात कर्मचारी गैरहजर असल्याचे त्यांना दिसून आले. त्यानुसार कामात हलगर्जीपणा केल्यामुळे आणि आदेशाचे पालन न केल्याचा ठपका ठेउन 11 कर्मचाऱ्यांची तातडीने उचलबांगडी करण्यात आली.
स्पॉटवर वाहतूक कर्मचारी आवश्यकच
पीकअवर्समध्ये वाहतूक कर्मचारी स्पॉटवर हजर असणे आवश्यक आहे. त्यासाठीच कर्मचाऱ्यांनी नियुक्ती चौकाचौकात करण्यात आलेली असते. मात्र, काही कर्मचारी पीकअवर्समध्येच गैरहजर असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांचे फावले जाते. वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास अपघातांची शक्यत असते.
उचलबांगडीनंतर प्रशिक्षणाला बसविले
वाहतूक नियमनासाठी तैनात केलेले काही कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले. त्याशिवाय काही कर्मचाऱ्यांनी बॅटन न वापरणे, रिफ्लेक्टर जॅकेट परिधान केले नव्हते. त्यामुळे संबंधित 11 कर्मचाऱ्यांना वाहतूक मुख्यालयातील रस्ते सुरक्षा विभागात प्रशिक्षणासाठी बसविण्यात आले आहे. –
राहूल श्रीरामे, वाहतूक उपायुक्त
























































