मानाच्या वळणावर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिबानी जोशी,[email protected]

तुमची 11व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल अभिनंदन. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? कारण तुम्ही साहित्य व नाटय़ दोन्ही संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अनुभव घेतला.

अर्थात आनंद तर झालाच. त्यात हे 99वं संमेलन आहे. पुढच्या वर्षी 100वं संमेलन होणार आहे. त्यामुळे मराठी नाटय़ चळवळीच्या शंभरीच्या उंबरठय़ावर ही निवड झाल्यामुळे परिषदेच्या छान वळणावर मलाही आनंद अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे मी खूश आहे.

नाटय़ संमेलनाध्यक्षाचं पद केवळ एक वर्षाकरता असतं. हा कालावधी फार कमी वाटतो का? इतक्या कमी वेळात कोणालाच खरं तर काम करता येणं शक्य नसतं.

ही परंपरा आता अनेक वर्षे सुरू आहे. त्यामुळे ती लगेच बदलता येईल असं नाही आणि हे पद, सन्मानाचं पद आहे. त्यामुळे तुम्ही एक वर्षात काय केलं किंवा काय नाही केलं हा प्रश्नच येत नाही. पण परिषदेने सहकार्य केलं तर इतर लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलाकार सर्वांच्या सहकार्याने मिळून काही तरी करावं अशी इच्छा आहे. बघूया काही छोटासा हातभार लावता आला तर. पद शोभेचं असलं तरी मानाचं आहे.

नाटय़संमेलनाला उत्सवी स्वरूप आलं आहे, त्यामुळे नाटय़क्षेत्राला काहीच मिळत नाही असं म्हटलं जातं, तुम्हाला काय वाटतं?

संमेलनाला इतकी जुनी परंपरा आहे. त्यामुळे मी त्यात बदल घडवू शकेन असं मला वाटत नाही, परंतु एक वातावरणनिर्मिती होते. ज्या भागात घडतं तिथे नाटय़परंपरेचं दर्शन घडवता येतं इतकं मात्र नक्की. उत्सवी रूप असलं तरी थोडंसं वैचारिकतेकडे वळवता आलं तर मला आवडेल.

एक वर्षाच्या कालावधीत काय करावं असं आपल्या मनात आहे?

एक वर्षात मी काही खूप बदल करू शकेन असं नाही, परंतु सध्याच्या रंगभूमीवर मनोरंजन, टाइमपास, अनुनय खूप दिसत आहे. अर्थात सर्व प्रकारची नाटकं आली पाहिजेत, परंतु थोडं वैचारिक ज्ञान देणारी नाटकं आणता येतील का? मग त्यासाठी परिषदेच्या अनेक ठिकाणी शाखा आहेत. त्यांचं सहकार्य घेऊन कार्यशाळा घेणं, त्यातून तिथल्या कलावंताचं एखादं नाटक बसवून त्याचे प्रयोग करावेत, असं काही मनात आहे. आता राज्याच्या कानाकोपऱयात वेगवेगळे नाटय़प्रकार होत असतात. उदा. विदर्भात झाडीपट्टी हा वेगळा नाटय़प्रकार आहे. पण तो मुंबई-पुण्यात पाहायला मिळत नाही व तिथल्या कलाकारांना गज्वी, तेंडुलकर, मतकरी यांची नाटकं माहीत असतील की नाही, माहीत नाही. मग अशा ठिकाणी जाऊन समन्वय साधता आला तर नाटय़सृष्टीलाच फायद्याचं आहे. बघूया.

सध्याच्या नाटय़सृष्टीविषयी तुमचं मत काय आहे?

व्यावसायिक रंगभूमीवर बहुतेक नाटकं मनोरंजनवादी आहेत. व्यवसायाचा विचार करून सुरू आहेत. पूर्वीपासून फडके-खांडेकर वाद प्रसिद्ध आहे. ‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला’ त्यापुढे जाऊन ‘ज्ञानासाठी कला’ असावी असं मला वाटतं. त्यासाठी बोधी नाटय़ परिषद आम्ही सुरू केली.

बोधी नाटय़ परिषदेचं तुम्ही मोठं काम करीत आहात, ते नेमकं कसं चालतं?

‘बोधी’ या शब्दाचा अर्थच आहे ‘ज्ञान’. ज्ञानाची रंगभूमी आम्ही घडवण्याचा प्रयत्न करीत आहोत. या कार्यात फक्त नाटकं नाहीत तर शिल्प, स्थापत्य, संगीत, नृत्य व चित्रकलेचाही समावेश केला आहे. ज्ञानाची रंगभूमी, हिला काही मर्यादा नाहीत. जगभरातलं ज्ञान नाटकांमार्फत पोहचवणं लेखक कल्पक असेल तर शब्दांच्या माध्यमातून तो आशय नीट पोचवू शकतो म्हणून कार्यशाळा घेणं, नाटकांचे प्रयोग करणं, त्यांची पुस्तकं प्रकाशित करणं अशी कामं आम्ही करत आहोत. गेल्या 15 वर्षांत आम्ही 28 ठिकाणी कार्यशाळा, शिबिरं केलीत. जवळजवळ 144 नाटकांचं वाचन केलंय. त्यातली 22 नाटकं कुठे ना कुठे सादर केले आहेत. त्यातून 13 नाटकं निवडून त्यावर प्रा. आदित्य देसाई यांनी केलेल्या समीक्षेचं ‘आर्ट ऑफ नॉलेज’ हे पुस्तकही प्रकाशित झालंय. आता एखाद्या घराला आग लागली आहे तर तेवढीच नाटकात दाखवली जाते किंवा ती विझवा असं दाखवलं जातं. पण ती कशी विझवायची. झोपडी व 20 मजली इमारतीतील लागलेल्या आगीत पण फरक आहे. कोणती आग कशी विझवायची हे दाखवणं म्हणजे ‘ज्ञानासाठी कला’ यासाठी बोधी नाटय़ परिषद काम करीत आहे. नाटक वाचल्यानंतर निवडलेल्या नाटकांचे बोधी नाटय़ महोत्सव आम्ही भरवले आहेत. आशुतोष पोतदार, अरुण मिरजकर, संगीता, स्वप्नील गांगुर्डे, भगवान हिरे असे अनेक लेखक-कलाकार यात जोडले गेलेत. पहिला महोत्सव ‘अविष्कार’बरोबर होता. संभाजीनगरचं विद्यापीठ, पुण्याचं विद्यापीठ, नागपूर, नांदेड, कणकवली, महाड, नाशिक, येवला, रत्नागिरी अशा अनेक ठिकाणी हे महोत्सव, कार्यशाळा झाल्या आहेत. केवळ नाटक नाही तर अंजठा-वेरूळ इथे स्थापत्य, शिल्प, चित्रकलेचा संगम आपल्याला दिसतो. तिथे आम्ही चार-पाच नवीन नाटककारांना नेलं होतं. तिथे राहिलो, पुस्तकं घेतली व त्यांना नाटक लिहा असं सांगितलं. दोन वर्षांनी त्यांनी नाटकं लिहिली. त्यातल्या चार नाटकांचा ग्रंथही प्रकाशित केला. आता मोठे प्रकाशन नाटक छापत नाहीत. त्यात व्यवहार बसत नाही म्हणून आम्ही बोधी प्रकाशनही सुरू केलं. गेल्या 30 वर्षांत जागतिकीकरण आलं. बाबरी मशीद, राममंदिर, शेतकरी आत्महत्यांसारखे वाद आले. त्याचा परिणाम समाजावर सखोल झाला. त्यावर रंगभूमीवर काही करता आलं का? ज्ञानाच्या रंगभूमीवरून त्यावर काही करता येईल का? बोधी नाटय़ परिषदेचं कामही आता अध्यक्ष झाल्यावर अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या सहकार्यानं करता आलं म्हणजेच परिषदेच्या विविध शाखांमध्ये काही उपक्रम राबवता आले तर ते पण पाहणार आहे. बघूया.

शासनाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत?

शासन नाटकांना अनुदान देतं. प्रायोगिक नाटकांनाही देतं; परंतु त्यात अटी खूप आहेत. शिवाय ते मागताना खूप डिटेलिंग, अकाऊंटस द्यावे लागतात. अर्थात गैरवापर होऊ नये म्हणून ते बरोबरच आहे. पण ज्यांना खरोखर गरज आहे त्यांनाही अनुदान द्यावं असं वाटतं. वृद्ध कलाकांरानाही जे मानधन दिलं जातं तेही दीडदोन अडीच हजार रुपये फारच कमी आहेत असं वाटतं.

तुमचं पुढचं नाटक कधी येतंय?

माझं ‘छावणी’ नावाचं नाटक लिहून तयार आहे. मध्यंतरी सेन्सॉर बोर्डानं ऑब्जेक्शन घेतलं होतं. आता मान्यता मिळाली आहे. नक्षलवादासारखा वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न केलाय; परंतु निर्मात्याच्या शोधात आहे.