पाचगणीत पुन्हा छमछमवर छापा;12 बारबाला, 25 खतविक्रेते, डीलरांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

निसर्गरम्य पाचगणीजवळील खिंगर (ता. महाबळेश्वर) येथे सातारा पोलिसांनी ‘पाचगणी टेंट हाऊस’ या रिसॉर्टवर छापा टाकून 12 बारबालांसह 25 खतविव्रेते आणि डीलर अशा 37 जणांना अटक केली. रिसॉर्टमध्ये बारबाला नाचवून पैसे उधळल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये 67 लाखांच्या गाडय़ा, एक लाख 29 हजारांचे मोबाईल व 10 हजारांचे इतर साहित्य जप्त केले. पाचगणी परिसरात पुन्हा छमछम सुरू झाल्याने जिह्यात खळबळ उडाली आहे.

सातारचे जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांना पाचगणीमधील खिंगर परिसरातील एका रिसॉर्टमध्ये काही लोक बारबालांसोबत नृत्य करीत असल्याची माहिती मिळली. त्यांनी तत्काळ पोलीस पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सातारा पोलीस पथकाने ‘पाचगणी टेंट हाऊस’ या रिसॉर्टवर छापा मारला असता, तेथे 10 ते 12 बारबाला तोकडय़ा कपडय़ात नृत्य करताना दिसून आल्या, तर 25 ते 30 जण मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेत चौकशी केली असता, सर्वजण सोलापूर जिह्यातील असून, खतविक्री व्यावसायिक आणि डीलर असल्याचे समजले.

पोलिसांनी घटनास्थळावरून 67 लाखांच्या गाडय़ा, एक लाख 29 हजारांचे मोबाईल व 10 हजारांचे इतर साहित्य जप्त केले. पोलिसांनी सर्वांना अटक केली असून, त्यांच्यावर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या कारवाईमुळे महाबळेश्वर, पाचगणीसह संपूर्ण सातारा जिह्यात एकच खळबळ उडाली आहे.