
देशात 12 लाख वेल्डर्सचा तुटवडा असल्याने पायाभूत सुविधांच्या विकासाचा वेग मंदावण्याची शक्यता असून सुमारे 100 लाख कोटी रुपयांची नवी गुंतवणूक धोक्यात आली आहे. वेल्डर्सच नव्हे तर फिटर्स, कटर्स, यंत्रचालक, अभियंते आणि निरीक्षकांचीही कमतरता भासत असल्याचा अहवाल ‘द इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ वेल्डिंग’ (आयआयडब्लू) या संस्थेने दिला आहे.
रस्ते, रेल्वे, पूल, ऊर्जा, शिपिंग अशा सर्वच प्रकल्पांमध्ये उच्चप्रतीच्या वेल्डिंग तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. हे काम केवळ प्रशिक्षित वेल्डर्सच करू शकतात. परंतु हिंदुस्थानी वेल्डर्सचा तुटवडा असल्याने ही कामे करण्यासाठी चीन, रशिया आणि पूर्व युरोपियन देशांमधील वेल्डिंग आणि कटिंग ऑपरेटर्सची मदत कंत्राटदारांना घ्यावी लागत आहे.
सध्या देशात 12 लाख वेल्डर्सचा तुटवडा असून येत्या पाच वर्षांत तो आकडा साडेतेरा लाखांवर जाण्याची शक्यता आहे. सेवानिवृत्त होणार्या कर्मचाऱयांच्या जागी नवी भरती केली जात नसल्यानेही हा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नवी भरती करावी तसेच देशात जागतिक दर्जाच्या वेल्डिंग प्रशिक्षणाची सुरुवात करावी अशी मागणी आयआयडब्लूने कौशल्य विकास मंत्रालयाकडे केली आहे.

























































