एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते तर राज्यपालांकडे ठराव का पाठवला?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते तर राज्यपालांकडे ठराव का पाठवला? सुरत व गुवाहाटीच्या प्रवासाच्या खर्चाचा तपशील जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून का लपवत आहात? सुरत-गुवाहाटीचा खर्च थर्ड पार्टीने केला होता का, अशी प्रश्नांची सरबत्ती अॅड. देवदत्त कामत यांनी आज शिंदे गटाचे आमदार व मंत्री दीपक केसरकर यांच्यावर केली.

आमदार अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणीचा आजचा पाचवा दिवस होता शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वकील अॅडव्होकेट देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे व शिंदे गटाचे आमदार मंत्री दीपक केसरकर व भरत गोगावले यांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत दिवसभर उलट तपासणी घेतली

शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदावरून कामत यांनी केसरकर यांना प्रश्न केला. जर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होण्यात रस नव्हता तर हा ठराव राज्यपालांकडे का पाठवला गेला, असा सवाल केला असता एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्याची पुष्टी या ठरावाने केली असे उत्तर केसरकर यांनी दिले. 21 जून 2022 चा हा ठराव मुख्य आधार होता, ज्याच्या आधारावर राज्यपालांनी 30 जून 2022 रोजी बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले होते, हे बरोबर आहे का? असा सवाल कामत यांनी केला असता गोंधळलेल्या केसरकर यांनी मला माहिती नाही असे उत्तर दिले.

केसरकर यांच्याआधी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची अॅड. देवदत्त कामत यांनी उलट तपासणी घेतली. अॅड. कामत यांनी पहिलाच प्रश्न विचारला, साक्षीत म्हणालात की पक्षाची घटना 1999 नंतर बदलण्यात आली नाही. तर, उलटतपासणीच्या उत्तरात म्हणालात की, मुख्य नेता पदासाठी घटनादुरूस्ती करण्यात आली. हे परस्परविरोधी विधान नाही का? यावर 1999-2012 ला निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बाळासाहेब ठाकरे यांनी घटना बनविली होती. त्यानंतर ती घटना पाळली गेली नाही. म्हणून जुलै 2022 रोजी मुख्य नेता पदाची घटनादुरुस्ती निवडणूक आयोगाच्या नियमानुसार केली, असे उत्तर शेवाळे यांनी देत केसरकरांनी त्यांच्या उलटतपासणीत दिलेल्या उत्तराचीच री पुढे ओढली.

उलटतपासणी पूर्ण

आमदार अपात्रता सुनावणीतील आज उलटतपासणी पूर्ण झाली. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब  ठाकरे)  दोन तर शिंदे गटाच्या पाच आमदारांची उलटतपासणी झाली. साक्षीदारांनी उलटतपासणीत दिलेल्या उत्तरांच्या व कागदपत्रांच्या आधारे दोन्ही गटाच्या  वकीलांचा येत्या सोमवारपासून तीन दिवस युक्तिवाद होणार आहे.

गोगावले म्हणतात, शिवाजी महाराज गेले म्हणून गुवाहाटीला गेलो

सुरतला जाण्यावरून देवदत्त कामत यांनी भरत गोगावले यांना प्रश्न केला त्यावर शिवाजी महाराज तिथे गेले होते. ते चांगले शहर आहे म्हणून तिकडे गोलो असे उत्तर गोगावले यांनी दिले. तर  गुवाहाटीच्या प्रवासाच्या खर्चावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भरत गोगावले म्हणाले की, कामाख्या देवीचे दर्शन स्वतःच्या पैशाने घेणे उचित आहे. म्हणून आमच्या स्वतःच्या पैशाने गेले होतो, असे उत्तर दिले. यावर तुमची मंत्री होण्याची इच्छा होती का असा प्रश्न देवदत्त कामत यांनी केला त्यावर इच्छा होती पण अजून मी मंत्री कुठे झालोय असे उत्तर देताच सभागृहात एकच हशा उसळला.

शेवाळेंचा अभ्यास कमी पडला

उलटतपासणीला जाताना प्रश्नांची कोणती गुगली पडेल हे शेवाळेंना माहित नव्हते. किंबहुना त्यांनी याबाबत अभ्यासच केला नसल्याचेच त्यांच्या उत्तरावरून उघड झाले. 1999-2012 या कालावधीत निवडणुका नियमानुसार झाल्या या प्रश्नावर शेवाळे यांनी नाही असे उत्तर दिले. यावर तुम्ही निवडणूक आयोगाच्या नियमांबद्दल बोलत आहात, ते नियम काय आहेत? असा सवाल त्यांना केला असता ते नियम रेकॉर्डवर आहेत असे उत्तर शेवाळे यांनी दिले.

वकील देवदत्त कामतांनी उलट तपासणीत मंत्री केसरकरांची चांगलीच काsंडी केली होती. कामत यांनी शिवसेना पक्षाच्या घटनेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केसरकरांनी बाळासाहेब ठाकरे लोकशाही मानत नसल्याचे सांगितले. बाळासाहेबांनी लोकशाहीची कुठलीही तत्त्वे कधीही पाळलेली नाहीत. ते मनमानीपणे पक्ष चालवत होते. त्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कुठल्याही निवडणुका घेतलेल्या नाहीत, असे उत्तर दिले.