
नवीन ज्युनियर कॉलेजना दिलेली मान्यता, ऑनलाइन प्रवेशात समाविष्ट केलेली कॉलेज यामुळे यंदा प्रवेशप्रक्रियेनंतर रिक्त राहणाऱया अकरावीच्या जागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या जागांमध्ये यंदा लाखांची भर पडली आहे. गेल्या वर्षी ऑनलाइन प्रवेशासाठी कोटा वगळून 1 लाख 08 हजार 629 जागा होत्या. या वर्षी तब्बल 2 लाख 29 हजार 654 जागांवर ऑनलाइन प्रवेश होणार आहेत.
अकरावी ऑनलाइन आणि कोटा प्रवेशप्रक्रियेसाठी आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स मिळून एकूण 3 लाख 70 हजार 235 जागा उपलब्ध आहेत. यात आर्टस् शाखेकरिता 48,570, कॉमर्स 1 लाख 98 हजार 740, सायन्स शाखेसाठी 1 लाख 17 हजार 920 जागा आहेत. शिक्षण उपसंचालक कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार इनहाउस कोटय़ासाठी 24 हजार 140, अल्पसंख्याक कोटय़ासाठी 1 हजार 335 आणि व्यवस्थापन कोटय़ात 15 हजार 866 आहेत.
ऑनलाइन प्रवेशासाठी शाखानिहाय जागा
शाखा वर्ष 2022-23 वर्ष 2021-22
आर्टस् 32,238 14,837
कॉमर्स 1,20,161 53,386
सायन्स 73,742 38,304
एचएसव्हीसी 3,313 4970
गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवेशक्षमता 1 लाख 21 हजारांनी वाढली
मागील दोन वर्षांची आकडेवारी पाहता 2020-21 मध्ये एकूण 3 लाख 26 हजार 796 जागांपैकी 2 लाख 18 हजार 730 जागांवर प्रवेश झाले, तर तब्बल 1 लाख 8 हजार 66 जागा रिक्त राहिल्या होत्या. मागील शैक्षणिक वर्षात म्हणजेच 2021-22 मध्ये 3 लाख 20 हजार 780 जागांपैकी 2 लाख 34 हजार 182 जागांवर प्रवेश झाले तर 87 हजार 38 जागा या रिक्त राहिल्या होत्या. यंदा ऑनलाइन प्रवेशाच्या जागांमध्ये वाढ झाल्याने रिक्त जागांची संख्याही वाढणार आहे.
























































