नोटाबंदीनंतर आणलेली 2 हजार रुपयांची नोट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच चलनातून बाद केलेली आहे. त्यानंतर आता आरबीआयने आपला मोर्चा 200 रुपयांच्या नोटांकडे वळवला आहे. रिझर्व्ह बँकेने सुमारे 137 कोटी रुपये किमतीच्या 200 रुपयांच्या नोटा बाजारातून काढून घेतल्याचे समजते. रिझर्व्ह बँकेने गेल्या 6 महिन्यांत ही कार्यवाही केली. आरबीआयने 200 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केलेल्या नाहीत किंवा या नोटा बाद करण्याचा कोणता हेतूही नाही. खरं तर बाजारातून नोटा परत मागवण्याचे कारण म्हणजे या नोटा खराब झालेल्या आहेत. यातील काही नोटा कुजलेल्या, फाटलेल्या अवस्थेत होत्या, तर काही नोटांवर लिहिल्यामुळे त्या चलनातून बाहेर काढाव्या लागल्या. गेल्या वर्षीही रिझर्व्ह बँकेने 135 कोटी रुपये किमतीच्या 200 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. तेव्हाही या नोटा घाणेरडय़ा, फाटलेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत चलनात होत्या.
कमी किमतीच्या नोटांवरही परिणाम
खराब झालेल्या नोटांमध्ये छोटय़ा नोटांची संख्याही जास्त आहे. 5 रुपयांच्या 3.7 कोटी किमतीच्या नोटा चलनातून काढल्या आहेत, तर 234 कोटी रुपये किमतीच्या 10 रुपयांच्या नोटा काढण्यात आल्या. त्याचप्रमाणे 20 रुपयांच्या 139 कोटींच्या नोटा, 50 रुपयांच्या 190 कोटींच्या नोटा आणि 100 रुपयांच्या 602 कोटी रुपये मूल्य असलेल्या नोटा बाजारातून परत मागवण्यात आल्या आहेत.