सामना प्रतिनिधी । मुंबई
महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी सतत झटणाऱया महाराष्ट्र पोलिसांच्या ‘क्विक रिस्पॉन्स टीम’मध्ये (क्यूआरटी) घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारित असलेला ‘लालबत्ती’ हा मराठी चित्रपट 26 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘साई सिनेमा’ या चित्रपट निर्मिती संस्थेची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केले असून निर्मिती संतोष सोनावडेकर यांनी केली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भविष्यात दहशतवादी हल्ले रोखायचे, त्यांना सडेतोड उत्तर द्यायचे, तर तसे प्रशिक्षित कमांडो दल असणे आवश्यक होते व याच गरजेतून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने पोलिसांच्या सबलीकरणासाठी ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ची (क्यूआरटी) स्थापना महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी केली. ज्येष्ठ पोलीस अधिकारी एस. बी. पवार आणि त्यांच्या हाताखाली क्विक रिस्पॉन्स टीममध्ये असणारा कमांडो गणेश यांच्या नातेसंबधाभोवती ‘लालबत्ती’ चित्रपटाची कथा फिरते. या चित्रपटात मंगेश देसाई, भार्गवी चिरमुले, तेजस, रमेश वाणी, मीरा जोशी, अनिल गवस, मनोज जोशी या कलाकारांच्या भूमिका आहेत.



























































