धक्कादायक!  5 वर्षांत आयआयटीच्या 27 विद्यार्थ्यांची आत्महत्या

550

देशातील ‘आयआयटी’सारख्या उच्च शिक्षण देणार्‍या, नावाजलेल्या शिक्षण संस्थांमध्ये गेल्या पाच वर्षांत 27 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 10 आयआयटीतील ही आकडेवारी आहे. सर्वाधिक आत्महत्या मद्रास आयआयटीत झाल्या आहेत. देशात एकूण 27 आयआयटी आहेत.

उच्च शिक्षणासाठी आयआयटीत प्रवेश मिळणे, तिथून शिक्षण पूर्ण करणे हे बुद्धिमत्तेबरोबरच प्रतिष्ठsचे मानले जाते, मात्र शिक्षण घेत असताना  विद्यार्थ्यांवर पडणारा ताण, रॅगिंग तसेच इतर कारणांमुळे विद्यार्थी आत्महत्या करतात. पण आत्महत्यांमागील कारणे पुढे येत नाहीत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती दिली  पण आत्महत्येची कारणे दिलेली नाहीत.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी संस्थांनी काय उपाययोजना केल्या आहेत यावर गुळगुळीत उत्तर देण्यात आले आहे. ‘प्रत्येक आयआयटीत विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी, त्या सोडवण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी तक्रार कक्ष तसेच समुपदेशन केंद्रेही आहेत’ असे सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

मद्रास-7, खडगपूर-5, दिल्ली-3, हैदराबाद-3, मुंबई-2, गुवाहाटी-2, रुकरी-2, वाराणसी-1, धनबाद-1 आणि कानपूर-1.

प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करा!

गणितज्ञ आनंद कुमार यांनी विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांसाठी आयआयटीच्या प्रवेश प्रक्रियेला जबाबदार धरले आहे. ते म्हणाले, ‘आयआयटीची सध्याची प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे बदलणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना कागदी ज्ञान देण्यापेक्षा ज्या विद्यार्थ्यांकडे नावीन्यपूर्ण कौशल्य आहे आणि विविध ताणतणावांना सक्षमपणे तोंड देणार्‍या विद्यार्थ्यांची निवड केली पाहिजे. मुलांच्या प्रमाणात शिक्षकांची संख्या वाढवावी. तसेच ज्या मुलांचे शिक्षण मातृभाषेतून झाले आहे अशा मुलांचे इंग्रजी सुधारण्यासाठी इंग्रजी भाषेचे विशेष वर्ग सुरू करावेत.’

आपली प्रतिक्रिया द्या