Lok sabha 2019 : लातूर मतदारसंघात ३ लाख ६९ हजार ५७१ मतदार वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा या लोकसभा निवडणुकीत ३ लाख ६९ हजार ५७१ मतदार वाढलेले आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपायुतीचे उमेदवार सुनिल गायकवाड यांचा तब्बल २५३३९५ मताधिक्यांनी विजय झालेला होता. त्यातच यावेळी मतदारांची झालेली वाढ ही लक्षणीय आहे. मतदानाची टक्केवारी वाढली तर काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठ्या मताधिक्याने पराभव होतो हे सत्य देशभरात दिसून आलेले आहे. त्यामुळेच लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराची चिंताही वाढलेली आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत ५७ लाख १३ हजार ७८७ एवढी मतदारसंख्या होती. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ही ७,१६,६८० तर महिला मतदारांची संख्या ७,९७,१०१ एवढी होती. लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये लातूर जिल्ह्यातील लातूर ग्रामिण विधानसभा मतदारसंघ, लातूर शहर विधानसभा मतदारसंघ, अहमदपूर विधानसभा मतदारसंघ, उदगीर विधानसभा मतदारसंघ, निलंगा विधानसभा मतदारसंघ आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

या लोकसभा निवडणुकीत २९ मार्च २०१९ पर्यंत मतदारांची नोंदणी करून घेण्यात आलेली आहे. त्यामुळे एका विधानसभा मतदारसंघात जेवढी संख्या असते तेवढी मतदारसंख्या वाढलेली दिसून येते. विशेष म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदारांची संख्या वाढलेली आहे. यावेळी १८,८३,५४२ एवढी मतदारसंख्या आहे. त्यामध्ये ९,९१,९४० पुरुष मतदार, ८,९१,५९३ महिला मतदार तर ९ तृतीयपंथीय मतदारही आहेत.

मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये तब्बल ३,६९,५७१ मतदार वाढलेले आहेत. त्यामध्ये २,७५,२६० पुरुष मतदार वाढलेले आहेत तर ९४,४९२ महिला मतदार वाढलेले आहेत. लातूर ग्रामिण विधानसभा मतदारसंघामध्ये ५९,४३३ मतदार वाढलेले आहेत. लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक ९३,०२५ मतदार वाढलेले आहेत. अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये ५५,२४० मतदार वाढलेले आहेत. उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये ५३,४०५ मतदार वाढलेले आहेत. निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये ४८,३०४ मतदार वाढलेले आहेत. नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये ६०,३४५ मतदार वाढलेले आहेत.

विशेष म्हणजे यावर्षी केवळ लातूर जिल्ह्यातच नव्हे तर देशभरात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. किमान ७५ टक्के सरासरी मतदार होईल असा प्रशासनाचा सध्याचा अंदाज आहे आणि हा अंदाजच काँग्रेसआघाडीच्या उमेदवाराची चिंता वाढवणारा आहे.

ज्या ज्यावेळी देशात मतदानाचा टक्का वाढलेला त्या त्यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात २,५३,३९५ एवढ्या मोठ्या मताधिक्याने मागील वेळी काँग्रेस उमेदवाराचा पराभव झालेला होता. यावेळी मतदार वाढलेले आहेत, मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे प्रयत्न होत आहेत. नव मतदार हा काँग्रेस विरोधी विचारसरणीचाच अधिक असल्याचे सर्वसाधारण चित्र रंगवले जाते. त्यामुळे यावेळी मागील मतदानापेक्षाही अधिक मताधिक्याने काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव होईल आणि शिवसेना भाजपा युतीचा विजय होईल, असे चित्र लातूर लोकसभा मतदारसंघात असल्याचे दिसून येत आहे.