
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई शहर व उपनगरात मागील सहा वर्षांत लागलेल्या आगींमुळे 300 जणांचा मृत्यू झाला तर 1 हजार 45 जण जखमी झाले. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियमानुसार मुंबईतील इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविणे बंधनकारक असून वर्षातून दोन वेळा इमारतींचे फायर ऑडिट करून त्याचे प्रमाणपत्र अग्निशमन दलाला सादर करणे बंधनकारक आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
परळच्या क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीबाबत शिवसेना आमदार अजय चौधरी, मंगेश कुडाळकर, संजय पोतनीस, वैभव नाईक, तृप्ती सावंत आदींनी प्रश्न उपस्थित केला होता. क्रिस्टल टॉवरच्या विकासकाने आग प्रतिबंधक उपाययोजना व अग्निसुरक्षा यंत्रणा बसवून ते कार्यान्वित असल्याबाबतचे भोगवटा ना हरकत प्रमाणपत्र घेतले नव्हते. आगीवेळी अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नव्हती. मुंबईत 2015 ते सप्टेंबर 2018 या काळात 5 हजार 804 अग्निसुरक्षा उपाययोजनांची पाहणी करण्यात आली त्यापैकी 2 हजार 942 इमारतींमध्ये अग्निसुरक्षा योजनेत त्रुटी असल्याचे आढळून आले. ज्यांनी नोटिशीनंतरही अग्निसुरक्षेची पूर्तता केली नाही त्यांच्या विरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत.
























































