2018 ठरले दहशतवाद्यांसाठी कर्दनकाळ, कश्मीरात 311 दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू-कश्मीरमध्ये 2018 हे वर्ष दहशतवाद्यांसाठी कर्दनकाळ ठरले आहे. लष्कराने यंदा 311 दहशतवाद्यांचा खात्मा केला. लष्कराचे अधिकारी लेफ्टनंट कमांडर जनरल अनिल कुमार भट्ट यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. कश्मीर खोऱ्यात मिळालेल्या या यशाचे श्रेय त्यांनी सुरक्षा दलांमधील समन्वय आणि कारवाईसाठी मिळालेल्या स्वातंत्र्याला दिले आहे.

कश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांनी उच्छाद मांडल्यानंतर लष्कराने ‘ऑपरेशन ऑल आऊट’ हे मिशन हाती घेतले आणि याद्वारे 2018 मध्ये 311 दहशतवाद्यांची सफाई करण्यात आली. गेल्या वर्षीपेक्षा यंदा या आकडेवारीमध्ये तब्बल 90 ने वाढ झाल्याचे दिसत आहे. 2017 मध्ये लष्कराने 232 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. तसेच गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये दहशतवादी कारवायांमध्येही वाढ झाल आहे. कश्मीर खोऱ्यात गेल्या वर्षी 342 दहशतवादी घटना घडल्या होत्या, तर 2018 च्या डिसेंबरपर्यंत 429 दहशतवादी घटना घडल्या. या दहशतवादी घटनांमध्ये 77 नागरिक ठार झाले तर 80 जवान शहीद झाले. तर 2017 मध्ये 40 नागरिक ठार झाले आणि 80 जवान शहीद झाले होते.

दहशतवाद्यांना स्थानिकांचा पाठिंबा
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी कश्मीरात यंदा गेल्या वर्षीपेक्षा अधिक हल्ले केले. या दहशतवाद्यांना स्थानिकांचाही पाठिंबा मिळत असल्याचे समोर आले असून ही चिंतेची बाब आहे. दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू असताना जवानांवर दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या. यात अनेक नागरिकांनाही जीव गमवावा लागला.

अद्यापही खोऱ्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय दहशतवादी
स्थानिकांचा दहशतवाद्यांना मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे खोऱ्यात स्थानिक दहशतवाद्यांच्या भरतीतही वाढ झाली आहे. हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटना कश्मीरी तरुणांना फितवून दहशतवादी कारवायांसाठी वापर करून घेत आहेत. एका अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, लष्कराने यंदा 311 दहशतवाद्यांचा खात्मा केला असला तरी अद्यापही कश्मीर खोऱ्यात 250 ते 300 दहशतवादी सक्रिय आहेत.