
मध्य रेल्वेवर येत्या शुक्रवार ते रविवार म्हणजेच 31 मे ते 2 जून दरम्यान जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी स्थानकातील 10 व 11 नंबरच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी व ठाणे स्थानकावरील 5 व 6 नंबरच्या प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान तब्बल 900 च्या वर लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात येणार असून या मेगाब्लॉकचा फटका एक्सप्रेस गाड्यांनाही बसणार आहे. त्यामुळे येत्या विकेंडला मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मेगा हाल होणार आहेत. मध्य रेल्वेने या ब्लॉक काळात प्रवाशांनी शक्यतो या मार्गावरून प्रवास करू नये असे सांगितले आहे.
मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावर शुक्रवार पासून 63 तासांचा तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर 36 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. गुरुवारी मध्य रात्रीपासून ठाणे स्थानकात सुरू होणारा हा मेगाब्लॉक 2 जून दुपारपर्यंत सुरू राहणार आहे. शुक्रवारी 31 मे रोजी लांब पल्ल्याच्या 4 गाड्या व 187 लोकल रद्द करण्यात येणार आहे. शनिवारी लांब पल्ल्याच्या 37 गाड्या व 534 लोकल तसेच रविवारी लांब पल्ल्याच्या 31 गाड्या व 235 लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम द्या
मध्य रेल्वेने सर्व सरकारी व खासगी कंपन्यांना ब्लॉकच्या काळात त्यांच्या कर्मचाऱ्यांना रजा किंवा वर्क फ्रॉम होम देण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रवाशांना देखील अतिशय गरजेच्या कारणाव्यतिरिक्त या मार्गावरून प्रवास करू नये असे आव्हान प्रवाशांना करण्यात आले आहे.































































