
सामना ऑनलाईन, मुंबई/नवी दिल्ली
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे. सोमवारी सेन्सेक्स 793 अंकांनी कोसळला. अवघ्या दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे सुमारे 5 लाख कोटी रुपये बुडाल्याचे वृत्त आहे.अर्थसंकल्पाच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजार कोसळला होता. सोमवारीही शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स तब्बल 907 अंकांनी कोसळला. बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 793 अंकांनी खाली आला होता. सेन्सेक्स 38,720 अंकावर बंद झाला. शुक्रवारी बीएसईच्या यादीवरील कंपन्यांची मार्केट कॅप 153.58 लाख कोटी होती. सोमवारी घसरण होऊन हा आकडा 148.43 लाख कोटींवर आला. त्यामुळे दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. राष्ट्रीय शेअर बाजारचा (निफ्टी) सेन्सेक्स 252 अंकांनी घसरून 11,558 वर बंद झाला.
कशामुळे पडझड?
केंद्रीय अर्थसंकल्पात गुंतवणूकदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेला नाही. त्यामुळे गुंतवणूकदार नाराज असल्याने शेअरबाजारात पडझड सुरू आहे असे तज्ञांचे मत आहे. पंजाब नॅशनल बँकेत भूषण पाव ऍण्ड स्टील या कंपनीचा 3800 कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. यामुळे ‘पीएनबी’च्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. तसेच बजाज फायनान्स, ओएनजीसी, एनटीपीसी, हीरो मोटो कॉर्प आणि मारुतीचे शेअर्स 8.18 टक्क्यांपर्यंत घसरले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 0.12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कच्चे तेल प्रतिबॅरल 64.31 डॉलर्सवर गेले आहे.

























































