
गर्दी टाळण्यासाठी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थिती ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असताना याच्या कठोर अंमलबजावणीसाठी पालिकेने सुरुवात केली आहे. यासाठी प्रत्येक विभागात तैनात असलेली पाच पथके खासगी कार्यालयांत धाडी टाकून नजर ठेवणार आहेत. नियम मोडल्याचे निदर्शनास आल्यास पालिकेकडून कारवाई केली जाणार आहे. या निर्णयामुळे लोकलमधील गर्दी कमी होण्यास मदत होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जानेवारीअखेर 334 पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या 5 हजारांपेक्षा जास्त नोंदवली जात असल्याने पालिकेचे आव्हान वाढले आहे. त्यामुळे खासगी कार्यालयांतील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कार्यालयांमध्ये उपस्थिती कमी राहिल्यास पर्यायाने लोकलमधील गर्दी कमी होण्यास मदत होणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
पालिका कर्मचाऱयांची उपस्थिती 100 टक्केच
खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थिती असली तरी पालिका कर्मचाऱयांची उपस्थिती मात्र 100 टक्केच राहणार आहे. पालिकेचे सर्व म्हणजेच सुमारे सवा लाख कर्मचारी अत्यावश्यक सेवेमध्येच येतात. कोरोना वाढला असताना अनेक कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. त्यामुळे पालिका कर्मचाऱयांची उपस्थितीत 100 टक्केच राहणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.






























































