5 जी प्रतीक्षा लवकरच संपणार; ट्रायने दिले संकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात आता 5 जीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. टेलिकॉम रेग्युलाटोरी अॅथोरिटीने (ट्राय) याबाबतचे संकेत दिले आहेत. या वर्षात मे महिन्यात 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यासाठी ट्रायकडे मार्चपर्यंत विक्री प्रक्रिया आणि नियमांबाबत सूचना करण्यात येऊ शकतात. वरिष्ठ टेलिकॉम अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे.

माहिती आणि दूरसंवादमंत्रई अश्विनी वैष्णव यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते की, ट्रायकडे 5 जी बाबत सूचना पाठवण्यात याव्यात. दूरसंवाद विभाग आणि ट्राय 5 जी साठी एकत्र काम करत असल्याचेही ते म्हणाले. त्यासाठी लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली होती.

ट्रायकडून सूचना आणि प्रकिया याबाबतची माहिती मार्चअखेरीस दूरसंवाद मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला मंजुरी मिळत निर्णयासाठी महिन्याभराचा काळ लागून शकतो, असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. टेलिकॉम सचिव के. राजारामण यांनी याबाबतची माहिती दिल्याचे पीटीआयने म्हटले आहे. ट्रायच्या सूचना आल्यानंतर लिलावाची प्रक्रिया सुरू होण्यासाठी सुमारे दोन महिन्यांचा वेळ लागणार असल्याचे राजारमण यांनी म्हटले आहे.

देशात 5 जी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर युजर्सना 4 जीपेक्षा 10 पट जास्त स्पीड मिळणार आहे. सध्या दूरसंवाद मंत्रालय ट्रायकडून येणाऱ्या सूचनांची वाट बघत आहे. स्पेक्ट्रमची किंमत, लिलावाची प्रक्रिया, स्पेक्ट्रमची ब्लॉ साइज, पैसे भरण्याची पद्धती आणि अटी यासह अनेक महत्त्वाच्या सूचना ट्राय करणार आहे. ट्रायकडून सूचना आल्यानंतर डिजिटल कम्युनिकेशन कमिशन यावर निर्णय घेणार आहे. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी तो मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे देशात आता लवकरच 5 जी सेवा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.