
कोयना धरणक्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडत आहे. धरणात प्रतिसेकंद सरासरी 23910 क्युसेक्स पाणी येत आहे. त्यात धरणातील उपलब्ध 103.84 टीएमसी पाणीसाठा व संपुष्टात आलेली पाणीसाठवण क्षमता लक्षात घेऊन धरणाचे सहा वक्री दरवाजे रविवारी दुपारी दोन वाजता एका फुटाने वर उचलण्यात आले आहेत. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात सध्या 103.84 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. आता धरणात केवळ 1.41 टीएमसी इतकेच पाणी सामावून घेतले जाऊ जाऊ शकते. त्याचवेळी सध्या प्रतिसेकंद धरणात सरासरी 23910 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे सध्या येणारे पाणी, धरणाची संपुष्टात आलेली साठवण क्षमता व अद्यापही प्रलंबित असलेला पाऊस लक्षात घेता कोयना धरण व्यवस्थापनाने रविवार पासून पुन्हा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी दुपारी दोन वाजता धरणाचे सहा वक्री दरवाजे एका फुटाने वर उचलून त्यातून 9214 क्युसेक्स व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 1050 क्युसेक्स असे एकूण 10264 क्युसेक्स पाणी प्रतिसेकंद कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
































































