31 लाख 50 हजारांचे बक्षिस असणाऱ्या 5 महिला नक्षलवाद्यांसह 6 जणांचे आत्मसमर्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

31 लाख 50 हजारांचे बक्षिस असणाऱ्या 6 जहाल नक्षलवाद्यांनी बुधवारी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यात पाच महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या सहा जणांवर जाळफोळ, चकमक, अपहरण, खून अशा विविध स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे.

संदिप उर्फ महारू चमरू बढे (30) हा जहाल माओवादी असून त्याच्यावर चकमकीचे 17, खूनाचे 4, जाळपोळीचे 7, अपहरणाचे 2 गुन्हे दाखल असून शासनाने त्याच्यावर 6 लाख 25 हजार रुपयाचे बक्षीस ठेवले होते. मनिषा उर्फ बाली उर्फ गंगाबाई जगनुराम कुरवामी माओवादी असून तिच्यावर चकमकीचे 9, खूनाचा 1 गुन्हा व जाळपोळीवे 2 गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर शासनाने 5 लाख 25 हजार रुपयाचे बक्षीस ठेवले होते. स्वरपा उर्फ संथिला उर्फ सरीता सुकलु आतला ही 23 वर्षीय माओवादी असून तिच्यावर चकमकीचे 6 आणि खूनाचे 4 गुन्हे दाखल आहेत. शासनाने तिच्यावर 5 लाख रुपयाचे बक्षीस ठेवले होते. अनी उर्फ मिला मोतीराम तुलावी ही 25 वर्षीय माओवादी असून तिच्यावर चकमकीचे 14, खूनाचे 5 व जाळपोळीचे 3 गुन्हे दाखल आहेत. शासनाने तिच्यावर 5 लाख रुपयाचे बक्षीस ठेवले होते. ममिता उर्फ ममता जन्ना राजु पल्लो ही वर्षीय माओवादी असून तिच्यावर चकमकीचे 3, जाळपोळीचा 1 गुन्हा दाखल आहे. शासनाने तिच्यावर 5 लाख रूपयाचे बक्षीस ठेवले होते. तुलसी उर्फ मासे सन्तु कोरामी ही 24 वर्षीय माओवादी असून तिच्यावर चकमकीचे 6 गुन्हे दाखल आहे. शासनाने तिच्यावर 5 लाख रुपयाचे बक्षीस ठेवले होते.

21 माओवाद्यांना अटक, 633 जणांचे आत्मसमर्पण
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे 2019 मध्ये एकूण 29 माओवादयांनी आत्मसमर्पण केले आहे. तर 21 माओवादयांना अटक करण्यात पोलीसांना यश प्राप्त झाले आहे. 2005 आजपर्यंत एकूण 633 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, अशी माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे यांनी दिली.