
विक्रोळी पूर्वेकडे एक तरुण 66 लाखांचा एमडीचा साठा घेऊन विकण्याच्या तयारी होता. पण पोलीस आल्याचे कळताच त्याने बुलेटला किक मारून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याचे प्रयत्न हाणून पाडत त्याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता 330 ग्रॅम एमडीचा साठा मिळून आला.
मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाचे आझाद मैदान युनिट ड्रग्जविरोधात कडक कारवाई करण्यासाठी गस्त घालत असताना विक्रोळी पूर्वेकडील गोदरेज बस स्टॉपजवळ उभा असलेला एक तरुण एमडी विकण्याच्या प्रयत्नात असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथक त्याच्याजवळ जाताच पोलिसांना बघून त्याने पळ काढू लागला. पण पोलिसांनी वेळीच त्याला अटकाव केल्याने त्याचा पळून जाण्याचा मनसुबा उधळला गेला. एमडी विकण्याआधीच तो पोलिसांच्या हाती लागला. अरबाज असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून 66 लाखांचा एमडी, 80 हजार किंमतीचा आयफोन, दीड लाख रुपये किमतीची बुलेट असा एकूण 68 लाख 50 हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.


























































