
गुजरातमधील सुरत शहरातील एका घरातील सात जणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यात तीन लहान मुलांचा देखील समावेश आहे. या घटनेने देशात खळबळ उडाली असून लोकांना दिल्लीत 2018 मध्ये घडलेल्या बुरारी आत्महत्या प्रकरणाीची आठवण करून दिली आहे.
मृतांमध्ये मनिष सोलंकी, त्यांची पत्नी रीता सोलंकी, वडील कानू सोलंकी, आई शोभा सोलंकी आणि दिशा, काव्या आणि कुशल नामक तीन मुलांचा समावेश आहे. यांपैकी 6 जणांची विष खाल्यानं तर मनीषने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. मनीषनं आधी कुटुंबातील सर्वांना विष दिलं त्यानंतर त्यानं स्वतः पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे.
मनीष सोलंकी याचा सूरत शहरात होम फर्निचरचा व्यवसाय होता तसेच त्याच्या हाताखाली 35 कर्मचारी काम करत होते. शनिवारी त्याच्या कर्मचाऱ्यांनी त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला पण मनीषनं फोन उचलला नाही. त्यामुळं एक कर्मचारी मनीषच्या घरी आला. बऱ्याचदा बेल वाजवूनही दरवाजा उघडत नसल्याने त्या कर्मचाऱ्याने शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा तोडला आणि ते घरात घुसले. त्यानंतर समोर भयंकर दृश्य पाहून सर्वांना धक्काच बसला. या कुटुंबातील सर्वांचे मृतदेह घरात होते. यानंतर पोलिसांनी घरात प्रवेश केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. तसेच पुढील चौकशी करण्यात येत आहे.




























































