
वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेने वेगाने लसीकरणाची व्यवस्था उभारली असताना केंद्राकडून लसींचे आवश्यक डोस मिळत नसल्यामुळे मुंबईत आज 120 पैकी तब्बल 71 व्हॅक्सिनेशन सेंटरवर लसीकरण बंद राहिले. त्यामुळे सुरू असलेल्या केंद्रांवर लांबच लांग रांगा लागल्या. अचानक संपलेल्या डोसमुळे अनेकांना लस न घेता माघारी परतावे लागले. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाल्यानंतर आतापर्यंत 15 लाखांवर लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. पालिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लसीकरण केंद्रे सुरू करून लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मुंबईतील पालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांची संख्या 120 वर गेली आहे. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईत लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे काल 8 एप्रिल रोजी एकाच दिवसांत तब्बल 25 केंद्रे बंद पडली होती. तर आज आणखी केंद्रे बंद पडली. आज सकाळी 49 केंद्रांवर लसीकरण सुरू झाले. मात्र यातील 19 केंद्रांवरील डोस संपल्याने दुपारनंतर या ठिकाणचेही लसीकरण बंद झाले. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर गोंधळ उडाला.
काळजी करू नका, संयम पाळा!
दरम्यान, लसींचे डोस मिळत नसल्याने सद्यस्थितीत काही सेंटर बंद करावी लागत असली तरी आगामी काळात आवश्यक डोस उपलब्ध होतील आणि पात्र असलेल्या सर्वांना डोस मिळेल असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी काळजी करू नये, धीर-बाळगावा असे आवाहन पालिकेने केले आहे.
तीन दिवस खासगी सेंटरवर लसीकरण बंद
पालिकेकडे असलेला लसींचा साठा शुक्रवारी संपला. शुक्रवारी रात्री डोस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे डोस आल्यास केवळ पालिकेच्याच केंद्रांवर लसीकरण सुरू राहील. शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस खासगी 71 केंद्रांवर लसीकरण बंद राहील अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.





























































