
लहान मुले कधी अशी करामत करतात की, मोठय़ांनाही ते जमणार नाही. बंगळुरूच्या अथर्व भट या आठ वर्षांच्या मुलाने अशाच पद्धतीने सर्वांना थक्क केले आहे. अथर्वने रुबिक्स क्यूबचे कोडे चक्क पायाने सोडवले आहे. त्याने दोन मिनिटांपेक्षा कमी वेळेत एकाच वेळी तीन रुबिक्स क्यूब सोडवून आपले नाव गिनिज बुकमध्ये नोंदवले आहे. यासाठी अथर्वने केवळ हाताचा नव्हे तर पायाचाही वापर केला.
अथर्वने एक मिनिट 29 सेकंदांत तीन रुबिक्स क्यूब सोडवले. त्याचा व्हिडीओ गिनिज बुक रेकॉर्डच्या यूटय़ूब चॅनेलवर 15 मार्च रोजी शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला अल्पावधीत लाखो लाईक्स मिळाले आहेत. तसेच कमेंटचा वर्षाव होत आहे. जिथे आम्ही हाताने रुबिक्स क्यूब सोडवू शकत नाही, तिथे या पठ्ठय़ाने पायाने कोडं सोडवलं, असं म्हणत नेटिजन्सनी अथर्ववर कौतुकाचा वर्षाव केलाय.

























































