
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरातील 969 मॅनहोलवर संरक्षक जाळय़ा बसविण्यात येणार आहेत. दुर्घटना टाळण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळय़ाआधी हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरांतील विभागात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळेच बसविण्यात आले आहे. यामध्ये पाइप, पेटीका आणि आर्च ड्रेनचा समावेश आहे. या जाळय़ांच्या देखभालीसाठी मॅनहोल (मनुष्य प्रवेशिका) बसविण्यात आल्या आहेत. मात्र या खोल जलवाहिन्या उघडय़ा राहिल्यास त्यामध्ये पडून जीवितहानी होण्याचा धोका असतो. अशा दुर्घटनाही घडल्यामुळे या मॅनहोलवर जाळय़ा बसविण्यात येत आहेत. ऑगस्ट 2017 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत पालिकेच्या सेवेत असलेले डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्यामुळे धोकादायक मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे मुंबई शहरासह उपनगरातील मॅनहोलवर संरक्षक जाळय़ा बसविण्यात येत आहेत. यामध्ये शहरातील 24,647 मॅनहोलमधील मोठय़ा आकाराच्या 1425 मॅनहोलवर संरक्षक जाळय़ा बसविण्यात आल्या आहेत. तर आता होणाऱ्या कामात पूर्व उपनगरातील 168 वर्तुळाकार व 254 आयताकार व पश्चिम उपनगरातील 281 वर्तुळाकार व 266 आयताकार मॅनहोलवर जाळय़ा बसविण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.
- पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील विभागांत अनुक्रमे 91 हजार 998 आणि 2 लाख 43 हजार 180 पर्जन्य वाहिन्यांची मनुष्य प्रवेशिका आहेत.
- टप्प्याटप्प्याने करण्यात येणाऱ्या या कामासाठी सन 2019-20 या वर्षाकरिता अर्थसंकल्पात या कामांसाठी 3 कोटी 12 लाख 18 हजार रुपयांची अतिरिक्त तरतूद केली आहे.
- शहर विभागात 47 वर्तुळाकार आणि 295 आयताकृती मनुष्य प्रवेशिकांवर लोखंडी जाळय़ा लावण्यात येणार आहेत.






























































