
पंजाबराव मोरे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांवरील निर्भेळ निष्ठा आणि महाकवी वामनदादा कर्डक यांची निर्मोही लेखणी यातून उतरलेल्या सामाजिक क्रांतीचा जागर करणाऱया 100 गीतांवर आधारित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संगीतशास्त्र विभागात जगातील सर्वात मोठा विद्यार्थीकेंद्रित ‘गीत भीमायण’ हा उपक्रम आकारास येत आहे. या उपक्रमाने अल्पावधीत तब्बल 10 कॉपीराईट (पेटंट) मिळविण्याचा भीमपराक्रम केला आहे.
कोणतीही गोष्ट यशस्वी करण्यासाठी ध्येय, चिकाटी, साधना आणि मनातील तळमळीची आवश्यकता असते. या विविध बाबींच्या सुरेख संगमातून होणारी निर्मिती ही सर्वांगसुंदर आणि ऐतिहासिक होते. अशीच एक कलाकृती आकार घेत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांवरील निर्भेळ निष्ठा आणि महाकवी वामनदादा कर्डक यांची निर्मोही लेखणी यातून उतरलेल्या सामाजिक क्रांतीचा जागर करणाऱया 100 गीतांवर आधारित हा उपक्रम आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संगीतशास्त्र विभागात त्याची निर्मिती सुरू आहे. ‘गीत भीमायण’ असे या उपक्रमाचे नाव. या उपक्रमाने अल्पावधीत तब्बल 10 कॉपीराईट (पेटंट) मिळविण्याचा भीमपराक्रम केला असून गिनिज बुकाकडे झेप घेण्याच्या तयारीत आहे.

तब्बल 17 वर्षांच्या नामांतराच्या प्रखर संगरातून 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा झाला. त्यानंतरच्या काळात अनेक कुलगुरूंनी आपापल्या परीने विद्यापीठाला नवे आयाम देण्याचा प्रयत्न केला. त्यातच संशोधन क्षेत्रात जागतिक पातळीवर दबदबा असलेले विद्यमान कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे यांनी पदाची सूत्रे स्वीकारताच सामाजिकशास्त्रामध्येही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या जागतिक कीर्तीच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर अभिनव संशोधनात्मक आणि विद्यार्थीमूलक उपक्रम राबविले जाऊ शकतात, असा विचार केला. कुलगुरू होण्यापूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांना स. भु. महाविद्यालयाच्या संगीत विभागाचे प्रमुख आणि विद्यापीठाच्या संगीतशास्त्र विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. संजय मोहड यांचा महाकवी वामनदादा कर्डक यांच्या गीतांचा कार्यक्रम ऐकण्याचा योग आला होता. वामनदादांच्या लेखणीतून दिसणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर काळजाला स्पर्श करणारे वाटले. कुलगुरू म्हणून आल्यानंतर 13 जानेवारी 2016 रोजी विद्यापीठ नामविस्तारदिनाच्या पूर्वसंध्येला नाटय़गृहात आयोजित कार्यक्रमातच डॉ. चोपडे यांनी केलेल्या घोषणेतून ‘गीत भीमायण’ची मुहूर्तमेढ रोवली गेली.
या प्रकल्पातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील बालपण, शिक्षण, महाड, काळाराम मंदिर, कायदामंत्रीपद, संविधानाची निर्मिती, पुणे करार, मूकनायक, जयभीमचा नारा, निळा रंग ते दीक्षाभूमी आदी महत्त्वाच्या घटना अधोरेखित करण्यात आल्या आहेत. त्यातून येणाऱया अनेक पिढय़ांपर्यंत वामनदादा कर्डक यांच्या लेखणीतील बाबासाहेबांचे विचार आणि माणुसकीचा संदेश समर्थपणे पेरण्याचा प्रयत्न झाला आहे.

या गीत भीमायणात वामनदादा कर्डक यांच्या निवडक 100 गीतांची निवड करण्यात आली आहे. डॉ. संजय मोहड यांनी या 100 गीतांना समर्पक असे संगीत दिग्दर्शन तर संगीत संयोजन नरेंद्र भिडे यांनी केले आहे. या गीतांना पद्मविभूषण आशा भोसले, पद्मश्री हरिहरन, पद्मश्री कविता कृष्णमूर्ती, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, शुभा जोशी, रघुनंदन पणशीकर, आरती अंकलीकर, सावनी शेंडे, साधना सरगम, बेला शेंडे, मंजुषा पाटील आदी नामवंत गायकांनी स्वरसाज चढवला असून विभागाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कोरस दिला आहे. शिवाय पद्मश्री विजय घाटे यांच्या तबल्याची गोडी मोहिनी घालणारी आहे. डॉ. मोहड यांनी दादांच्या क्रांतिकारी आणि काळजाला भिडणाऱया गीतांना यमन, भूपाळी, दरबारी, कानडा, शिवरंजनी, जौनपुरी, भीमपलास, मांड, पहाडी, जोग, पुरिया धनाश्री, भैरव, तिलककमोद, नट भैरव आदी रागांच्या गुंफणीसोबत लोकसंगीताच्या बाजाचे मोहक केंदणही लावले आहे. आज 50 गाणी पूर्णत्वास गेली आहेत. त्यापैकी 10 गाण्यांना 60 वर्षांसाठी कॉपीराईट मिळाल्याने जगाच्या पाठीवर एकाच प्रकारच्या उपक्रमातील नावीन्यपूर्णतेसाठी 10 कॉपिराईट (सामाजिक शास्त्रांतील पेटंट) मिळविणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे एकमेव ठरले आहे. पुढची काही गाणी राजन-साजन मिश्रा, शौनक अभिषेकी, राशीद खान, आशा भोसले, शंकर महादेकन, सोनू निगम यांच्याकडून गाऊन घेतली जाणार आहेत. संगीताच्या इतिहासात एकाच व्यक्तीवर, एकाच गीतकाराच्या गाण्यांचा प्रकल्प हा जगातील एकमेव प्रकल्प असल्याने हा प्रकल्प आता गिनिज बुकाकडे झेप घेउै पाहात आहे. चमत्कार म्हणजे या उपक्रमातील गीते गाण्यासाठी आणि अल्बमच्या खरेदीसाठी विद्यापीठाकडे अर्ज यायला लागले असून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या प्रकल्पाचे संकल्पक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉ. बी. ए. चोपडे म्हणाले की, जागतिक पातळीवरील अभिनव, अपूर्व, अजोड व ऐतिहासिक अशी ‘गीत भीमायण’ ही शास्त्र्ााrय संगीताची नवनिर्मिती आहे. जगातील पहिल्या विद्यार्थीकेंद्रित व जागतिक विक्रम प्रस्तापित करणाऱया या उपक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनकार्य, विचार व तत्त्वज्ञान शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून संबंध जगातील घराघरात पोहोचेल याची मला खात्री वाटते. सर्व सहकाऱयांच्या प्रेरणेतून आणि सहकार्यातून हे ऐतिहासिक काम करता आले याचा आनंद आहे. यानिमित्ताने विद्यापीठाची कीर्तीपताका जगभर जाईल. देशातील बहुजन समाजाच्या सांस्कृतिक उन्नयनाचे हे एक प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास वाटतो.




























































