
सामना प्रतिनिधी । निफाड
चिंचोली येथील सर विश्वेश्वरय्या इन्सिटय़ूटमधून केमिकल इंजिनीअरिंगची पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर नोकरी की व्यवसाय हा प्रश्न रूपाली समोर होता. पिंपळगाव-बसवंत येथे रचना केमिकलमध्ये एक वर्ष तिने नोकरी केली, पण समाधान मिळाले नाही. पुन्हा गावाकडे निफाड-शिंगवे येथे येऊन तिने थेट चहाची टपरी चालू करण्याचा विचार केला आणि सायखेडा येथे बासुंदी व तंदुरी चहा ग्राहकांना देण्यास तिने सुरुवात केली. आज तिचा हा चहा ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे.
आई-वडील व भावास ही चहाची संकल्पना रूपालीने सांगितल्यानंतर त्यांनी पाठिंबा दिला, शिंगव्याचे उपसरपंच धोंडीराम रायते यांना भेटली. त्यांनी आपली मोक्याच्या ठिकाणी असलेली जागा तात्पुरती उपलब्ध करून दिली. यातून कुठेतरी रूपालीचे स्वप्न पूर्णत्वास येण्यास सुरुवात झाली. नोकरीतील अनुभव पाठीशी होता. त्यामुळे व्यवसाय करण्याचे नक्की केले. चहाचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरल्यानंतर चहाच्या गुणवत्तेसाठी इंजिनीअरिंगच्या अनुभवाचा उपयोग झाला. सायखेडय़ातील ग्राहकांना बासुंदी व तंदुरी चहा तिने उपलब्ध करू दिली. ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला.
एक युवती त्यातही इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले असल्याने साहजिकच बहुतेकांनी तिला नोकरी करण्याचा सल्ला दिला. ग्रामस्थांनी तिच्या या निर्णयाचे कौतुक केले. याच व्यवसाय विस्तारासह साधारणतः 3 ते 4 किलोमीटरपर्यंत पार्सल सुविधा देण्याचा आशावाद रूपालीने व्यक्त केला आहे.
































































