सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
राफेल करारावरून संसदेत सरकारला कोंडीत पकडल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. पंतप्रधानांना त्यांनी राफेल कराराच्या प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्याचे आव्हान दिले. मात्र, चर्चा करण्यासाठी मोदींमध्ये धैर्य नसल्याचा आरोपही त्यांनी केला. राणे यांच्या उघड झालेल्या ऑडिओ क्लिपमधून करारात घोटाळा झाला आहे, हे स्पष्ट होत असल्याचे सांगत ”देश का चौकीदार चोर है” या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला. अनिल अंबानी यांना मोदींनी कंत्राट मिळवून दिले आणि 30 हजार कोटी रुपये मोदी यांनी अंबानी यांच्या खिशात घातले, असा आरोप त्यांनी केला.
गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची एक ऑडिओ क्लिप आहे. त्यात ते समोरच्या व्यक्तीला सांगतात की, मंत्रीमंडळाच्या बैठकीत पर्रिकर म्हणाले आहेत, त्यांच्या बेडरुममध्ये राफेलबाबतच्या सर्व फाइल आहेत. या फाइलद्वारे पर्रिकर पंतप्रधानांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोपही राहुल यांनी केला. पर्रिकरांकडे असलेल्या फाइलमध्ये राफेलची गुपिते आहेत. त्या फाइलच्या मोदींवर नेमका काय परिणाम होणार आहे, असा सवालही त्यांनी केला.
राफेलची किंमत 1600 कोटी असल्याचा आकडा जेटली यांनी स्वतःच सांगितल्याचेही राहुल म्हणाले. त्यानंतर 526 कोटींची असणारी राफेल विमाने 1600 कोटींची कशी झाली, राफेलच्या किंमती कशा वाढल्या, हवाई दलाने वाढलेल्या किंमतीना आक्षेप घेतला नाही काय, किंमती वाढवण्याच्या निर्णय कोणाचा होता, तसेच हवाई दलाला 126 विमानांची गरज असताना फक्त 36 विमाने खरेदी करण्याचा निर्णय का घेण्यात आला अशा प्रश्नांचा भडीमार राहुल यांनी मोदी यांच्यावर केला. माजी संरक्षणमंत्री सांगतात की त्यांना नव्या कराराबाबत कोणतीही माहिती नाही. तसेच त्यांच्याकडे कराराची फाइल आहे. यावरून मोदी यांनी हवाई दलाचा आक्षेप झुगारून कोणालाही विश्वासात न घेता करारात बदल केल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच त्यांनी हिंदुस्थान अॅरोनेटिक्सएवजी अनिल अंबानी यांना कंत्राट देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोपही राहुल यांनी केला. अंबानी यांच्यावर 45 हजार कोटींचे कर्ज आहे. मोदींनी त्यांना 30 हजार कोटींचा फायदा करून दिला आहे. या कराराच्या जेपीसी चौकशीची मागणी आम्ही केली आहे. या चौकशीत नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी ही दोन नावे उघड होतील असेही राहुल म्हणाले. 70 वर्षांचा अनुभव असलेल्या हिंदुस्थान अॅरोनेटिक्सला डावलून करार होण्यापूर्वी 10 दिवस आधी स्थापन केलेल्या अंबानी यांच्या कंपनीला कंत्राट देण्यात आले. आमचे सरकार आल्यावर याची आम्ही चौकशी करू असे आश्वासनही त्यांनी दिले.
राफेल विमानांबाबत आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही. ही विमाने चांगली आहेत. मात्र, करारात घोटाळा झाल्याचेही स्पष्ट आहे. मोदी म्हणतात, राफेलबाबत त्यांच्यावर कोणतेही आरोप नाहीत. ते कोणत्या जगात वावरत आहेत. आम्ही थेट त्यांनाच प्रश्न विचारत आहोत. तसेच चर्चेसाठी त्यांना थेट आव्हान देत आहोत. राफेलबाबत त्यांनी जनतेला माहिती द्यावी असे राहुल म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत क्लीन चीट दिलेली नसून फक्त न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात हा मुद्दा येत नाही असे न्यायालयाचे म्हणणे असल्याचेही राहुल यांनी सांगितले.

























































