
सामना प्रतिनिधी, कवठे यमाई
टाकळी हाजी परिसरात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. भागातील जनावरांचा चारा व शेतीपिके जळून चालली असून पाटबंधारे विभागाने त्वरित कार्यवाही करून मीना कालवा व कुकडी नदीला पाणी सोडावे अशी मागणी या भागातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे शेतकरी नेते प्रकाशराव भाकरे यांनी केली आहे.
टाकळी हाजी परिसर हा बागायती भाग म्हणून प्रसिद्ध आहे .बेट भागाला घोडनदी, कुकडी नदी व मीना कालव्याचे वरदान लाभले आहे.परंतु यंदाच्या वर्षी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून भीषण पाणीटंचाईला सामारे जावे लागत आहे. कुकडी नदी व मीना कालव्याचे आवर्तन येऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. कुकडी व घोडनदीवरील बंधारे दीड महिन्यापूर्वीच आटले असून शेतकऱ्यांना पाण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागत आहे.
या भागातील टाकळी हाजी, शिनगरवाडी, म्हसे बु. माळवाडी, वडनेर, सरदवाडी, जांबुत, फाकटे, चांडोह आदी गावच्या तसेच पारनेर तालुक्यातील निघोज, गाडीलगाव, गुणोरे, रसाळवाडी आदी गावांच्या पाणीयोजना कुकडी नदीवर अवलंबून आहे. तसेच मीना कालव्याला पाणी आल्यास या भागातील विहरींच्या पाणी पातळीत वाढ होउन ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तसेच जनावरांच्या चाऱ्याची समस्या दूर होण्यास निश्चित मदत होणार आहे.
कालवा समितीच्या बैठकीत पाच मार्चलाच मीना कालव्याचे पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. परंतु अद्यापही याबाबत पाटबंधारे विभागाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेतकरी वर्गामध्ये मोठी निराशा निर्माण झाली आहे. या भागातील जीवापाड मेहनत घेऊन जागविलेल्या डाळिंब बागा, कांदा, ऊस व जनावरांचा चारा जळून चालला आहे. तरी पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या सध्याच्या गंभीर समस्येची त्वरित दखल घेऊन मीना कालव्याला व कुकडी नदीला लवकरात लवकर पाणी सोडण्याची कार्यवाही करावी अशी मागणी भाकरे यांनी केली आहे.




























































