
सामना प्रतिनिधी। पनवेल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तरुणांना संधी देण्यासाठी माढा मतदारसंघातून माघार घेत असल्याची घोषणा करताच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी सोमवारी दुपारी शेकापसोबत गुफ्तगू केले. आमदार बाळाराम पाटील यांच्या नावडे येथील निवासस्थानी अर्धा तास बैठक घेऊन मदतीचा हात मागितला.
अनेक दिवसांपासून पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत खलबते सुरू होती, मात्र अंतर्गत बंडाळी माजेल या भीतीने गेल्या आठवडय़ात पार्थ यांचे नाव काहीसे मागे पडले. परंतु शेकाप नेते जयंत पाटील यांनी पार्थ पवार यांना उमेदवारी द्या, आम्ही बिनशर्त पाठिंबा देतो असे जाहीर केले. यानंतर सोमवारी सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन तरुणांना संधी देण्यासाठी आपण माढा मतदारसंघातून माघार घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळातच राष्ट्रवादीत वरिष्ठ पातळीवर चक्रे फिरली आणि पार्थ पवार यांनी तडक पनवेल गाठून शेकाप व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱयांच्या भेटीगाठी घेतल्या. इतकेच नाही तर आमदार बाळाराम पाटील यांच्या नावडे येथील निवासस्थानी अर्धा तास बैठक घेऊन पुढील रणनीती ठरविण्यात आली.
























































