कुडाळात आदर्श होळी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद: हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालया समोरील एस. एन. देसाई चौकात बुधवारी सायंकाळी झालेल्या आदर्श होळी उपक्रमाला कुडाळ तालुक्यातील हिंदू धर्माभिमान्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी होलिकेचे विधिवत पूजन कुडाळ येथील धर्माभिमानी डॉ. गुरुप्रसाद सवदत्ती यांनी केले. दरम्यान, गावागावात होळीचे विधिवत पूजन करण्यात आले आहे. तालुक्यात सध्या शिमगोत्सवाची धुम सुरू आहे.

होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्या माध्यमातून वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. दुर्दैवाने सध्या या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. धर्मशास्त्र समजून घेऊन त्यानुसार सण-उत्सव साजरे केले, तर त्याचा आध्यात्मिक लाभ होतो. कोकणात होळी हा सण प्रत्येक गावात शहरात साजरा केला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही गावामध्ये अपवाद वगळता सर्व ठिकाणी होळी मोठ्या उत्साहात साजरा झाला. हिंदूंचे धार्मिक सण – उत्सव आदर्शरीत्या कसे साजरे करावेत या बाबत हिंदूंना प्रभोधन व्हावे यासाठी सनातन संस्था आणि हिंदुजनजागृती समिती यांनी संयुक्त रित्या आदर्श होळी उत्सव साजरा केला. जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळ, शिरोडा या ठिकाणी मोठ्या संख्येने सनातन संस्थेचे साधक हिंदुजनजागृतीचे कार्यकर्ते असेच धर्माभिमानी हिंदु उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, धर्माभिमानी व सनातनचे साधक, उपस्थित होते. कुडाळ येथील पूजेचे पौराहित्य नेरूर येथील पुरोहित मंजुनाथ फडके यांनी केले. नजीकच्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक हिंदूंनी उत्सुकतेने या कार्यक्रमाचा लाभ घेतला. यावेळी सौ. शिवानी रेडकर यांनी होलिका उत्सवाचे महत्व, या उत्सवादरम्यान होणारे गैरप्रकार याविषयी माहिती देऊन आदर्श होळी साजरी करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला बहुसंख्य हिंदू धर्माभिमानी यांची उपस्थिती लाभली. यावेळी होळी उत्सवाचे महत्त्व सांगणाऱ्या हस्तपत्रकांचे वितरण करण्यात आले. कुडाळ येथील कार्यक्रमाला डॉ संजय सामंत, आनंद नाईक, सदानंद रेडकर, सदानंद मसुरकर, वासुदेव तेंडोलकर, वासुदेव सडवेकर, सुरेश पाटील, सदाशिव घाग, नागेश कोपदार, राजाराम परब, सौ. निलीमा सामंत, सौ. संपदा चिऊलकर, कु. अक्षता मार्गी,सौ रेश्मा पाटील, सौ. शिवानी रेडकर, सौ. मंजुषा खाड्ये आदी उपस्थित होते.