संजय दत्त लोकसभा निवडणूक लढवणार? वाचा सविस्तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

‘मी उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद मतदारसंघातून सपाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार अशी जोरदार चर्चा सुरु होती. पण मला निवडणूक लढवण्यात रस नाही. मात्र निवडणूक लढवणार नसलो तरी देशासोबत खंबीरपणे उभा राहण्याचा माझा निर्धार आहे’, असे ट्विटरवर स्पष्ट करीत बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने आपल्या उमेदवारीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

निवडणूक लढवणार नसलो तरी माझी भिन्न काँग्रेस उमेदवार प्रिया दत्त हिला मात्र मी सक्रिय मदत करणार आहे, असे सांगून संजय ट्विटमध्ये पुढे म्हणतो, देशासाठी मतदान करण्याचं आवाहन मी प्रत्येकाला करतो. कारण लोकशाही बळकट करण्यासाठी आपण सर्वानी मोठ्या प्रमाणात मतदान करायला हवे.

2009 साली जेव्हा संजय दत्तने राजकारणात प्रवेश केला, तेव्हा राज्यसभा खासदार अमर सिंह यांच्या आग्रहाखातर त्याने ‘सपा’मध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी संजय दत्तने लखनौ येथून निवडणूक लढविण्याची घोषणा देखील केली होती. परंतु काही कारणास्तव तो निवडणूक लढवू शकला नव्हता. नंतर अमरसिंह यांनी समाजवादी पक्षाला रामराम केल्यानंतर संजय दत्तनेही पक्षाशी फारकत घेतली.संजय दत्तचे वडील सुनील दत्त काँग्रेस खासदार होते. तर बहिण प्रिया दत्तदेखील काँग्रेसकडून खासदार झाल्या आहेत.