
सामना ऑनलाईन, मुंबई
मोबाईल चोराचा पाठलाग करून त्याला पकडायला गेलेल्या प्रवाशाचा लोकल गाडीखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी चर्नीरोड रेल्वे स्थानकात घडली. शकील शेख असे या प्रवाशाचे नाव असून ते हॉटेल ताज येथे कामाला होते.
गोरेगाव येथील रहिवासी असलेले शकील नेहमीप्रमाणे चर्चगेटला जलद लोकलने जात होते. सकाळी 6.45 वाजता चर्नीरोड येथे त्यांची लोकल पोहचली असता प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर एका अज्ञाताने लोकलमध्ये प्रवेश करीत त्यांचा मोबाईल फोन हिसकावला आणि तो पळाला. शेख यांनी धावत्या लोकलमधून त्या मोबाईल चोरास पकडण्यासाठी उडी मारली; परंतु ते मरीनलाइन दिशेकडील प्लॅटफॉर्मच्या टोकावरून तोल गेल्याने कोसळले आणि त्यांच्या अंगावरून लोकल गेली. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 52 वर्षीय शकील यांना दोन मुले आणि पत्नी असून अशाप्रकारे चोर दिवसाढवळ्या लोकलमध्ये चढून प्रवाशांच्या चीजवस्तू पळवीत असतील तर चोरटय़ांना कायद्याचा धाकच राहिला नसल्याचे त्यांचे नातेवाईक प्रीतेश त्रिपाठी यांनी म्हटले आहे.
आरपीएफने या प्रकरणात सीसीटीव्हीच्या मदतीने रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेणे सुरू केले असून अद्यापही कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी अशाप्रकारे आरोपीला पकडण्याचे साहस करू नये. त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार करावी असे आरपीएफने म्हटले आहे.





























































