
सामना प्रतिनिधी, अलिबाग
राजधानी मुंबई, नवी मुंबई ही दोन्ही महानगरे आता गर्दीने ओव्हरपॅक झाली आहेत. घरांचे भाव तर गगनाला भिडले असून काढते शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे शहरांमध्ये जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यकाळाची गरज लक्षात घेऊन आता अलिबागजवळ तिसरी मुंबई उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडकोने घेतला आहे. अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन, म्हसळा या तालुक्यांतील 84 गावांमध्ये ‘एकात्मिक औद्योगिक वसाहत’ अंतर्गत तिसरी मुंबई उभारली जाईल. त्यासाठी 19 हजार हेक्टर जमीन संपादित करणार असून लवकरच भूसंपादन प्रक्रियेलाही सुरुवात होणार आहे. जमिनीच्या सर्वेक्षणासाठी 14 कोटींच्या निधीला मंजुरी सिडकोने दिली आहे.
सिडकोच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत तिसऱया मुंबईवर शिक्कामोर्तब करण्यात आले. 15 हजार 954 हेक्टर जमीन ही औद्योगिक वसाहतीसाठी तर चार हजार हेक्टर जमीन ही नागरी वसाहतीसाठी संपादित केली जाणार आहे. या भागात एकात्मिक औद्योगिक वसाहतीची निर्मिती करण्याचा प्रस्ताव आहे. तिसऱ्या मुंबईसाठी जमीन संपादन प्रक्रिया रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून होणार असून सिडको समन्वयाची भूमिका बजावणार आहे. त्यासाठी एका सनदी अधिकाऱ्यासह आठ अन्य उच्च अधिकाऱ्यांचा एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. सिडकोत सध्या व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासह इतर दोन सनदी अधिकारी आहेत. सरकारने आणखी एक सनदी अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांची नियुक्ती केली आहे.
रोहा व अलिबाग तालुक्यातील चणेरा भागात ही तिसरी मुंबई वसवली जाणार आहे. हा अतिशय भव्य प्रकल्प असून त्यामुळे रायगड जिल्ह्यात रोजगाराची नवी साधने उपलब्ध होणार आहेत.
सिडकोने एकात्मिक औद्योगिक प्रकल्पाच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याने प्रत्यक्षात तिसरी मुंबई या परिसरात उभी राहणार आहे.
या प्रकल्पात माणगाव तालुक्याचाही समावेश केला जाणार असल्याचे बोलले जाते. कुंडलिका नदीचे दुतर्फा पात्रही विकसित केले जाणार आहे.
जलवाहतुकीला मिळणार चालना
अलिबागजवळ तिसरी मुंबई उभारल्याने राज्याच्या आर्थिक प्रगतीलाही मोठी चालना मिळणार आहे. लवकरात लवकर रायगडात पोहोचता यावे यासाठी मुंबई ते रेवस मांडका जलवाहतूक अधिक गतिशील होणार असून तीन हजार कोटींच्या समुद्रीमार्गाचा प्रस्ताव आहे. त्यामुळे या तिसऱ्या मुंबईला महत्त्व प्राप्त होणार आहे.




























































