आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍या निवृत्त अधिकार्‍याला मारहाण, सहा शिवसैनिकांची जामिनावर सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्याची गय केली जाणार नाही हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण  असून महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य आहे अशी शिवसेनेची ठाम भूमिका असल्याचे शिवसेना नेते, मुख्य प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. समाजात अशांतता व तणाव निर्माण होऊ न देणे हे सत्ताधार्‍यांइतकेच विरोधकांचेही कर्तव्य आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.

मुख्यमंत्र्यांबाबत बदनामीकारक व्यंगचित्र सोशल मीडियावर प्रसारीत करणार्‍या माजी नौदल अधिकार्‍यावर काल हल्ला झाला. याप्रकरणी सहा शिवसैनिकांना अटक करण्यात आली. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. या प्रकरणावरून विरोधकांनी आता राजकारण सुरू केले आहे. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, हा हल्ला म्हणजे शिवसैनिकांची संतप्त आणि तितकीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. या घटनेत हल्लेखोरांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. विरोधी पक्षाने या घटनेचे राजकीय भांडवल करावे हे दुर्दैवी आहे. संयम दोन्ही बाजूंनी पाळला गेला पाहिजे.

‘पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री या घटनात्मक पदांबाबत टोकाची टीका करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार झाला तर लोकांच्या संयमाचा बांध तुटतो. म्हणून सगळ्यांनीच जबाबदारीने, एकमेकांचा आदर ठेवून वागण्याची ही वेळ आहे.’ असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.