
बहुचर्चित आर्यन खान प्रकरणाचा तपास आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या मुंबई युनिटकडून काढून तो एनसीबीच्या विशेष एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे. आर्यन खान आणि अन्य पाच प्रकरणांची चौकशी एसआयटी करणार आहेत. चौकशीसाठी एनसीबीचे डेप्युटी डायरेक्टर जनरल संजय सिंग यांचे पथक मुंबईत आले आहे.
एनसीबी मुख्यालयाने झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंच्या मुंबई युनिटला शॉक दिला आहे. मुंबई युनिटकडे असलेली सहा प्रकरणांचा (आयर्न खान केस, समीर खान, अरमान कोहली, मुंब्रा एमडी ड्रग्ज केस, जोगेश्वरी 1 किलो चरस केस, डोंगरी एमडी केस) तपास आता एनआयटी करणार आहे.
आर्यन खान केसमध्ये तपासी अधिकारी नाही. सहा केसेसबाबत तपास व्हावा यासाठी आपण एनसीबी मुख्यालयाला विनंती केली होती. ती विनंती मुख्यालयाने मान्य केली आहे. मला तपासातून हटवले नाही.
– समीर वानखेडे, झोनल डायरेक्टर एनसीबी मुंबई, गोवा युनिट
आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकवले
आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात शंभर टक्के अडकवण्यात आले असून हे संपूर्ण प्रकरण घडवण्यात आले, असा दावा या प्रकरणातील एक साक्षीदार विजय पगारे यांनी केला आहे. इतकेच नाही तर, या प्रकरणात मोठी डील करण्यात आली होती. मात्र पुढे ही डील फसली, अशी खळबळजनक माहिती पगारे यांनी दिली आहे. सुनील पाटील, मनीष भानुशाली आणि किरण गोसावी यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावाही विजय पगारे यांनी केला आहे. किरण गोसावी याने या प्रकरणात 50 लाख रुपये घेतले होते. संपूर्ण डीलमधील काही रक्कम अधिकाऱयांना जाणार होती. सुनील पाटील याचे समीर वानखेडे यांच्याशी सतत बोलणे होत होते, असेही पगारे यांनी सांगितले.
दक्षता विभागाकडून तपास अधिकाऱयाची चौकशी
एनसीबीच्या दक्षता विभागाने क्रूझ ड्रग्जपार्टी धाड प्रकरणातील तपास अधिकारी आशीष रंजनप्रसाद यांची 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी कसून चौकशी केली. त्याआधी दोन दिवस प्रसाद यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. प्रसाद यांची मुंबईतही चौकशी करण्यात आली होती. समीर वानखेडे यांच्यावरील ‘तोडपाणी’च्या आरोपांची दक्षता खात्याकडून कसून चौकशी सुरू आहे. त्याच अनुषंगाने प्रसाद यांना चौकशीला सामोरे जावे लागले.
सचिन वाझेंच्या पोलीस कोठडीत वाढ
खंडणी वसुली बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वाझेंच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना पोलीस बंदोबस्तात किल्ला कोर्टात हजर केले होते. खंडणी प्रकरणात पोलिसांनी वाझेंच्या आवाजाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत. सुनावणीदरम्यान क्राईम ब्रँचने वाझेंच्या पोलीस कोठडीची मागणी केली. पोलीस कोठडीदरम्यान पोलिसांनी वाझेंना व्हॉट्सअॅप कॉल आणि तक्रारीबाबत विचारणा केल्याचे समजते. तसेच पोलिसांनी वाझेंकडून एक मोबाईल जप्त केला आहे.






























































