
सांगली जिल्ह्यात शिवभोजन केंद्रातून आत्तापर्यंत 22 लाख 63 हजारांहून अधिक थाळ्यांचे वाटप करण्यात आले. कोरोनाकाळात गरजवंताला शिवभोजन थाळीने खरा आधार दिला आहे.
राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवभोजन योजना सुरू केली. त्यानुसार सांगली जिल्ह्यात 26 जानेवारी 2020 रोजी शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. आजमितीस सांगली जिल्ह्यात सांगली महापालिका क्षेत्रात 20 व तालुका स्तरावर 18 अशी एकूण 38 शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. जिल्ह्याचा शिवभोजन योजनेचा नियमित इष्टांक 4825 असून, जिल्ह्यातील केंद्रांतून 26 जानेवारी 2020 ते 8 नोव्हेंबर 2021 अखेर एकूण 22,63,429 थाळ्यांचे वाटप झाले आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 1 एप्रिल 2020 पासून 13 एप्रिल 2021 पर्यंत शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना 5 रुपये प्रतिथाळीप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आली. या काळात 10 लाख 46 हजार 392 लाभार्थ्यांनी थाळीचा लाभ घेतला. 15 एप्रिल 2021 पासून 30 सप्टेंबर 2021 पर्यंत दीडपट इष्टांक तसेच मोफतप्रमाणे शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या काळात 9 लाख 48 हजार 268 इतक्या लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला. 1 ऑक्टोबर 2021 पासून शिवभोजन थाळी मूळ इष्टांकासह 10 रुपये प्रतिथाळीप्रमाणे लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.

























































